भोगावती कारखाना सुरळीत चालवणे हीच पी.एन. पाटील यांना श्रद्धांजली | पुढारी

भोगावती कारखाना सुरळीत चालवणे हीच पी.एन. पाटील यांना श्रद्धांजली

कौलव: पुढारी वृत्तसेवा: आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांनी जन्मभर तत्वनिष्ठ व एकनिष्ठ राजकारण केले. तत्वाशी जागणारा व समाजाचे कल्याण करणारा नेता अशी त्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. भोगावती साखर कारखाना त्यांनी जीवापाड जपला होता. त्यामुळे आगामी काळात हा कारखाना सुरळीतपणे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, अशा शब्दांत भोगावती कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या अस्थि कलश पुजन व शोकसभेत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी शोक भावना व्यक्त केल्या. यावेळी राधानगरी व करवीर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते कृष्णराव किरूळकर यांच्या हस्ते व सडोली खालसा येथून आणलेल्या अस्थिकलशाचे पूजन ज्येष्ठ सभासद विष्णू हरी पाटील ( देवाळे) यांच्या हस्ते करण्यात आले.

कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील देवाळेकर म्हणाले की, भोगावती साखर कारखाना आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे चालला आहे. मात्र, त्यांच्या आकस्मित निधनामुळे संपूर्ण भोगावती खोऱ्याला धक्का बसला आहे. भोगावती साखर परिवाराचा आधारवड गमावला आहे. त्यामुळे आगामी काळात कारखाना सुरळीतपणे चालवून ऊस उत्पादक व कामगारांची ही लक्ष्मी टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरूळकर म्हणाले की, पी. एन. पाटील यांनी जन्मभर समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेऊन तत्वनिष्ठ राजकारण केले. त्यांनी काँग्रेसचे विचारसरणी आणि सर्वसामान्यांचे हित याबाबत कधीही तडजोड केली नाही. त्यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे भोगावती परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे यांनी आमदार पाटील यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे जिल्ह्याचा मोठा विकास झाला आहे. भोगावती खोऱ्यावर त्यांचे प्रचंड उपकार आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराने वाटचाल करत सर्वांना बळ देणे गरजेचे आहे.

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले की, पी. एन. पाटील हे तत्त्वाशी व निष्ठेची प्रामाणिक राहणारे नेतृत्व होते.त्यांनी आपल्या कर्तुत्वाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ यांच्यासह विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही.

भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले म्हणाले की, पी. एन. पाटील यांच्या जाण्याने विकासाचा दृष्टिकोन असलेला व तत्वनिष्ठ असणारा नेता गमावला आहे. आगामी काळात सर्वांनीच भोगावती कारखाना सुरळीत चालवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते क्रांतिसिंह पवार पाटील म्हणाले की, पी. एन. पाटील यांचा जिल्ह्याच्या विकासात सिंहाचा वाटा होता. तत्त्व निष्ठेने गोरगरिबांसाठी अहोरात्र राबणारा नेता व कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या अकाली जाण्याने झालेले नुकसान कधीही भरून निघणार नाही.

यावेळी गोकुळचे संचालक किसन चौगुले, कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर, संजयसिंह पाटील, माजी उपाध्यक्ष एम. आर. पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, बळी पाटील सिरसेकर, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, शिवसेनेचे अजित पाटील परितेकर, भारत आमते, जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, भीमराव कांबळे, राज्य साखर कामगार युनियनचे कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, भोगावतीचे संचालक केरबा भाऊ पाटील, बाबासाहेब देवकर, बळी पाटील शिरसेकर, सुरेश कुसाळे, सुशील पाटील कौलवकर, देवबा पाटील, व्यापार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, बळी पाटील सोनाळीकर, आदीसह विविध मान्यवरांनी आमदार पाटील यांना आदरांजली वाहिली.

यावेळी भोगावती साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक मंडळ, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे, रविश पाटील कौलवकर, जयसिंगराव हुजरे, उदयानी देवी साळुंखे, सुप्रिया साळोखे, पांडुरंग भांदिगरे, सर्जेराव पाटील हळदीकर, भाजपचे डॉ. सुभाष जाधव, एकनाथ पाटील, नामदेवराव पाटील कुरुकलीकर, तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. पाटील, धनाजी कौलवकर, कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रा. निवास पाटील, पी. डी. चौगले यांच्यासह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button