औरंगाबाद : बेपत्ता सख्ख्या बहिणीचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले | पुढारी

औरंगाबाद : बेपत्ता सख्ख्या बहिणीचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले

कन्नड: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिखलठाणा येथील ३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बहिणीचे मृतदेह विहिरीत तरंगताना आज (दि. १६) आढळून आले. स्वाती दत्तु चव्हाण (वय१९) आणि शितल दत्तु चव्हाण (वय १५) असे मृत दोन सख्ख्या बहिणीची नावे आहेत. या दोघींचा त्यांच्याच शेतातील जुन्या पडक्या विहिरीत पडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (दि.१४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास विहिरीच्या कडेला असलेले गिन्नी गवत जनावरांना कापून आणतो, असे सांगून स्वाती आणि शितल शेतात गेल्या होत्या.  सायंकाळ झाली तरी मुली घरी का आल्या नाही, म्हणून कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोधाशोध केली. मात्र, मुली कुठेच आढळून आल्या नाहीत. त्यामुळे भयभीत झालेले वडील दत्तु बाबुराव चव्हाण यांनी मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.

सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नातेवाईक मुलीचा शोध घेत असताना गिन्नी गवताच्या शेजारच्या  गट क्रमांक १७० शेतातील जुन्या पडक्या विहिरीत स्वाती आणि शितल या दोन्ही सख्ख्या बहिणीचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम बारहाते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी चिखलठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. वैद्यकीय अधिकारी जयदिप झगरे, वैद्यकीय अधिकारी समरीन खान यांनी सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button