Dhule Crime : लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून : अवघ्या २४ तासांत प्रियकराला ठोकल्या बेड्या | पुढारी

Dhule Crime : लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून : अवघ्या २४ तासांत प्रियकराला ठोकल्या बेड्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून (Dhule Crime)करणाऱ्या प्रियकराला धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकाने शिर्डीमधून आज (दि. १६) बेड्या ठोकल्या. चारित्र्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, तपास पथकाने २४ तासात खून करणाऱ्या प्रियकराला गजाआड केल्याने त्यांना ५ हजार रुपयांचे पारितोषिक पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्याच्या जमनागिरी परिसरामध्ये बादल रामप्रसाद सोहिते आणि नीता वसंत गांगुर्डे हे दोघे गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र काही दिवसानंतरच बादल हा चारित्र्याचा संशय घेऊन निता यांना बेदम मारहाण करीत होता. रविवारी (दि. १५) सकाळी नीता या मयत अवस्थेत आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. निता यांच्या चेहऱ्यावर जबर दुखापत झाली असून गळा देखील दाबल्याचे निदर्शनास आल्याने हा खून असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. त्यामुळे नीता यांचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा (Dhule Crime) दाखल करण्यात आला.

Dhule Crime  : खून झाल्यापासून बादल सोहिते फरार

खून झाल्यापासून बादल सोहिते हा फरार होता. त्यामुळे धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे हे त्याच्या मागावर होते. त्याला ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील तसेच विजय शिरसाठ, अविनाश कराड, प्रवीण पाटील, तुषार मोरे, शाकीर शेख, गुणवंत पाटील, प्रसाद वाघ, महेश मोरे, गौरव देवरे या पथकाने शोधमोहीम सुरू ठेवली.

बादल सोहिते श्रीरामपूर येथे बहिणीच्या घरी लपून बसला होता

सुरुवातीला बादल याला सचिन गांगुर्डे हे भ्रमणध्वनीवर संपर्क करून तो कुठे आहे, याची माहिती घेत होते. मात्र बादल हा सातत्याने सचिन यांना तो धुळे शहरालगत चितोड गावातच असल्याचे सांगून दिशाभूल करीत होता. पोलीस पथक बादल यांने सांगितलेल्या ठिकाणावर जाऊन तपासणी करत होते. मात्र, त्यांना यश येत नसल्याने संशय आणखी बळावला गेला. अखेर बादल याची बहीण श्रीरामपूर येथे रहात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी श्रीरामपूर गाठले. त्याच्या बहिणीने खून झाल्याचे माहिती मिळताच बादल याला आश्रय देण्यास नकार दिला. त्यामुळे बादल याने शिर्डी गाठून भक्तीधाममध्ये भोजन घेतले. त्याचप्रमाणे तो तेथेच राहण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, या गुन्ह्याची बादल याने कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या समवेत अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी हे उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button