औरंगाबाद : गंगापूरमध्ये सासुने किडनी देऊन सुनेला दिले जीवदान | पुढारी

औरंगाबाद : गंगापूरमध्ये सासुने किडनी देऊन सुनेला दिले जीवदान

गंगापूर; रमाकांत बन्सोड:  सासू-सुनेचे नाते तसे न पटणारे, असे समीकरणच ठरून गेले आहे. सासू कधीही आई होऊ शकत नाही, तसेच सुनेला ती नेहमीच पाण्यात पाहते, अशी भीती सुनेला असते, असे चित्र समाजात काही घटनांमुळे तयार झाले आहे. पण सगळ्याच सासू एकसारख्या नसतात. त्या आपल्या सुनेवर मुलीइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम करतात, हे लासूर स्टेशन येथील जैस्वाल कुटुंबातील सासूने सिद्ध करून दाखविले आहे.

लासूर स्टेशन येथील माजी ग्राम सदस्य संजय रमेश जैस्वाल यांच्या पत्नी योगिता संजय जैस्वाल या गेल्या वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. कित्येक महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीस करावे लागत होते. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्टरनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. योगिता यांचा ब्लड ग्रुप ‘ए’ पॉझिटिव्ह आहे. इतर नातेवाइक तसेच इतरांची किडनी त्यांना जुळत नव्हती. यामुळे संजय जैस्वाल व त्यांचे भाऊ अजय व सचिन यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले. याबाबत कुटुंबात चर्चा होत असतांनाच क्षणाचाही विचार न करता ६४ वर्ष वयाच्या योगिता यांच्या सासू रत्नाबाई रमेश जैस्वाल यांनी किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी सासुची किडनी योगिता यांना जुळते की नाही, सासू रत्नाबाई यांचे वय लक्षात घेता त्यांना कोणती आरोग्यविषयी अडचणी भविष्यात येणार नाही ना याचा कुटुंबातील सदस्यांनी केला. यासाठी योगिता यांचे पती संजय जैस्वाल यांनी तामिळनाडू येथील कोवाई रुग्णालयाशी संपर्क साधला. दोघींच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांची किडनी सुनेसाठी जुळेल असे स्पष्ट झाले. सासूच सुनेसाठी देवाच्या रूपाने धावून आल्या. १४ जानेवारी (संक्रांतीच्या पूर्व संध्येला) सकाळीच शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. कोईमतूर (तमिळनाडू) येथील कोवाई रुग्णालय येथे तब्बल नऊ तास चाललेली ही शस्त्रक्रिया डॉ. विवेक पाठक अन्य स्टाफने यशस्वीपणे पार पाडली.

गतजन्माची आई असेल

किडनी दान करून सासूंनी मला नवे आयुष्य दिले आहे. कदाचित गतजन्माचे आमचे मुलगी व आईचे नाते असावे. सासू ही आईच आहे, असे मी समजते असे योगिता संजय जैस्वाल यांनी सांगितले.

एकाच नाण्याच्या दोन बाजू

सासू-सून या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे नाणं खणखणीत असंल तरच मुलाचा संसार सुखाचा होईल. मुलाच्या सुखातच आपलं सुख मानत आले. त्यांच्यासाठी त्याग करण्याचा मी प्रयत्न केला आहे. सुनेच्या काळजीपोटी डोळ्यात पाणी यायचे असे किडनीदाता सासू रत्नाबाई जैस्वाल यांनी म्हटले.

Back to top button