जालना : पावसाने पुन्हा उडविली दाणादाण … पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

जालना : पावसाने पुन्हा उडविली दाणादाण ... पिकांचे मोठे नुकसान

जालना; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पडलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.सोमवारी सकाळपर्यंत घनसावंगी मंडळात सर्वाधिक 84 तर सुखापुरी मंडळात 77 मि.मी. पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात सोमवारपर्यंत 812 मि.मी. पावसाची नोंद झाली असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 124  टक्के  एवढा आहे.अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.

जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडविली आहे. अंबड व घनसावंगी तालुक्यात सुखापुरी व घनसावंगी
मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. खालापुरी येेथे ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
रविवारी रात्री व सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी सोयाबीन काढून शेतात ठेवली होती. पावसामुळे सोयाबीनची माती झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 14.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 812 मि.मी. पाऊस पडला असुन वार्षीक सरासरीच्या तो 124 ट ?े एवढा आहे. सोमवारी सकाळपर्यंत जालना शहरात 37 मि.मी. पावसाची नोंद झाली. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी मंडळात 50, रांजणी 56 मि.मी. पाऊस पडला आहे. तुलनेने इतर ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. गतवर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी शेतात ऊस आडवे पडले आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या
हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात होण्याची भीती आहे

पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत

सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा … अंबड तालुक्यात रविवारीपासुन सर्वदूर पावसास सुरुवात झाली आहे. परतीच्या मुसळधार पावसामुळे सुखापुरी मंडळात 77 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे सोयाबीनसह कपाशी, उडीद, तूर, बाजरी व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंबड तालुकयात गेल्या 24 तासांत 22 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसामुळे सणासुदीच्या दिवसात खरिपाच्या पिकांबरोबरच बागायती
पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

अंबड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने अचानकपणे हिरावून घेतल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सुखापुरी महसूल मंडळासह तालुक्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांसाठी नजीकच्या काळात सोयाबीन हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. दिवाळीपूर्वी सोयाबीनची कापणी करून त्याच्या विक्रीतून सण साजरा केला जातो. मात्र, ऐन सोंगणीच्या तयारीत असलेल्या
सोयाबीन पिकांवर मुसळधार पावसाने घाला घातल्याने शेतकर्‍यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. दिवाळीचा
सण कसा साजरा करावयाचा ? असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा आहे.

अंबड तालुक्यात ऑक्टोबर हिटमुळे शेतकर्‍यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणारा कापूस यंदा लवकरच फुटला आहे. ग्रामीण भागात कपाशी वेचणीसाठी एकीकडे मजूर मिळत नसतानाच परतीच्या पावसाने आता वेचणीस आलेला कापूस अनेक ठिकाणी भिजल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. पावसाने यावर्षी खरिपांच्या पिकातील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

मदतीची गरज

जिल्ह्यात अंबड-घनसावंगी तालुक्यातील काही मंडळात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनसह कापूस व बाजरीसह इतर पिकांचे नुकसान झाल्याने शासनाच्या वतीने मदतीची गरज आहे.

खालापुरीत ढगफुटी

तीर्थपुरी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील खालापुरी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे सोयाबीनसह कापूस, तूर, बाजरी, मोसंबी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .तीर्थपुरी परिसरातील खालापुरी, बोडखा, खडका, भायगव्हाण परिसरात विजेच्या कडकडाटासह सोमवारी पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या तोंडी आलेला घास अचानकपणे पडलेल्या परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने तीर्थपुरी महसूल मंडळासह तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांसाठी नजीकच्या काळात सोयाबीन हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते.दिवाळीपूर्वी सोयाबीनची कापणी करून त्याच्या विक्रीतून सण साजरा करायची तयारी शेतकर्‍यांनी केली होती. मात्र काढणीला असलेल्या सोयाबीन पिकांवर मुसळधार पावसाने घावा घातल्याने शेतकर्‍यांच्या स्वप्नाचा चुराडा झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने आता कपाशी भिजून गेल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. तसेच जास्तीच्या पावसाने यावर्षी खरीपांच्या पिकातील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने ऐन सनासुदीच्या वेळीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. तीर्थपुरीसह खालापुरी खडका बोडखा आदी गावामध्ये नदी नाल्या तुडुंब भरून वाहत होते.

 

 

Back to top button