औरंगाबाद : दोन हजारांची लाच घेणारा भूमापक जाळ्यात | पुढारी

औरंगाबाद : दोन हजारांची लाच घेणारा भूमापक जाळ्यात

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : जमिनीची मोजणी व हद्द कायम करीत नकाशा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी (दि. 29) रंगेहाथ पकडले. संबंधित भूमापकाने यापूर्वी ही तीन हजार रुपये घेतले होते. उर्वरित रकमेपैकी पहिला हफ्ता घेताना सोमवारी त्याला पथकाने रंगेहाथ पकडले. संजीत उत्तमराव कविटकर (वय 45) असे पथकाने पकडलेल्या भूमापकाचे नाव आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शेतक-याने काही महिन्यांपूर्वी आपल्या जमिनीची मोजणी करून नकाशा मिळण्यासाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. क्षेत्राची मोजणी व हद्द कायम करीत मोजणी नकाशा देण्यासाठी संजीत कविटकर याने लाच मागितली होती. अर्जदार व कविटकर यांचा 7 हजार रुपयांत व्यवहार ठरला होता.

क्षेत्र मोजणी झाल्यावर तक्रारदाराकडून कविटकर याने तीन हजार रुपये स्विकारले होते. त्यानंतर उर्वरित 4 हजार रुपयांसाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक रुपचंद वाघमारे, भीमराज जिवडे, दिगंबर पाठक, विलास चव्हाण, चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने सोमवारी भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावला. पथकाच्या पंचासमक्ष कविटकर याने 4 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

त्यापैकी पहिला हफ्ता म्हणून 2 हजार रुपये त्याने तक्रारदाराकडून घेताच पथकाने छापा टाकून त्याला पकडले. पथकाने कविटकर याला वैजापूर पोलिस ठाण्यात नेले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भूमापक संजीत कविटकरयाच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Back to top button