औरंगाबाद : सावरगाव येथे कारमधून दीड लाखाची देशी, विदेशी दारू जप्त | पुढारी

औरंगाबाद : सावरगाव येथे कारमधून दीड लाखाची देशी, विदेशी दारू जप्त

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : ड्राय डेच्या दिवशी कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरातील एका हॉटेलजवळील कारमधून देशी, विदेशी, दारू व बियर असा मिळून एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या सिल्लोड विभागाने केली.

स्वातंत्र्य दिनी ड्राय डे पाळला जातो. मात्र, सावरगाव परिसरातील एका हॉटेलवर अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी सुनील अर्जुन सोनवणे (रा. सावरगाव) याच्या कारमध्ये (एम एच ०४ – सीबी ३३७२) देशी, विदेशी, बियरच्या अशा एकूण ३७६ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन. एस. डहाके, सहायक दुय्यम निरीक्षक प्रविण पुरी, जवान अमित नवगिरे, अमोल अन्नदाते यांनी केली.

 कन्नड तालुक्यातील हॉटेल, ढाबे या ठिकाणी अवैध दारू विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय कार्यालय कन्नड तालुक्यातून अन्य तालुक्यात हलविले आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. त्याचबरोबर छोट्या-मोठ्या गावांसुध्दा देशी दारूची अवैधरित्या विक्री होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी अवैध दारू विक्रीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button