जम्मू- काश्मीर : आयटीबीपी जवानांची बस नदीपात्रात कोसळली, ७ जणांचा मृत्यू, ३० जखमी | पुढारी

जम्मू- काश्मीर : आयटीबीपी जवानांची बस नदीपात्रात कोसळली, ७ जणांचा मृत्यू, ३० जखमी

 

जम्मू- काश्मीर : पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे ब्रेक फेल झाल्याने बस नदीपात्राला लागून असलेल्या दरीत कोसळली. या बसमधून आयटीबीपीचे ३७ जवान आणि दोन जम्मू- काश्मीर दलातील पोलिस कर्मचारी प्रवास करत होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जखमी झाले आहेत. त्यातील ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा आयटीबीपी आणि १ पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जखमी जवानांना उपचारासाठी एअरलिफ्ट करुन श्रीनगरकडे नेण्यात आले. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

जम्मू- काश्मीरमधील चंदनवाडी येथे ही दुर्घटना घडली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने ती नदीपात्रात कोसळली. चंदनवाडी पहलगामपासून १६ किलोमीटर अंतरावर आहे. नुकतीच अमरनाथ यात्रा संपली. या यात्रेसाठी तैनात असलेले सुरक्षा जवान आपल्या तुकडीसोबत पहलगामकडे परतत होते. या दरम्यान त्यांच्या बसला अपघात झाला.

आयटीबीपीच्या प्रवक्त्यानी सांगितले की, “३९ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीपात्रात कोसळली. या बसमधून जवान चंदनवाडीहून पहलगामला जात होते.” बस अपघातात ITBP च्या ७ जवानांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे. तर ३० जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचार सुरु आहेत. आयटीबीपी मुख्यालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून जवान परतत होते, अशी माहिती ITBP च्या PRO ने दिली आहे.

Back to top button