पिंपरी : सर्व्हर डाऊन समस्येमुळे दाखल्यांसाठी रांगा | पुढारी

पिंपरी : सर्व्हर डाऊन समस्येमुळे दाखल्यांसाठी रांगा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक व अन्य कारणांसाठी लागणारे विविध दाखले घेण्यास आलेल्या नागरिकांना शुक्रवारी महाऑनलाइनच्या प्रणालीत निर्माण झालेल्या सर्व्हर डाऊनच्या समस्येचा फटका बसला. आकुर्डी येथील तहसील कार्यालयाजवळील नागरिक सुविधा केंद्रात दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागल्याने शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध दाखल्यांची मागणी वाढली आहे. शहरात 95 महा ई सेवा केंद्र आणि आकुर्डीतील एका नागरिक सुविधा केंद्राच्या (सेतू केंद्र) माध्यमातून हे दाखले दिले जातात. उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) आदी दाखल्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

त्याशिवाय, शासकीय कामांसाठी देखील दाखले काढणार्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, त्यासाठी करण्यात येणारे अर्ज सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे ‘सबमिट’ होण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या जाणवत आहे.

Back to top button