उबाठाचे काँग्रेसीकरण झाले!, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेना टोला | पुढारी

उबाठाचे काँग्रेसीकरण झाले!, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेना टोला

नितीन थोरात

वैजापूर; पुढारी वृत्तसेवा : उबाठाचे काँग्रेसीकरण झालेले आहे. ते बाळासाहेबांचे विचार विसरले. बाळासाहेब म्हणाले होते, काँग्रेसला लांब ठेवा. परंतु, बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले आणि आज काँग्रेसची भाषा बोलणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे, अशा शब्दांत ठाकरेंचा समाचार घेत लोकसभेच्या झालेल्या तीन टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांच्या प्रचारार्थ वैजापूर येथे आज (ता.१०) रात्री आठ वाजता आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे मंत्री उदय सामंत, मंत्री अब्दुल सत्तार, आ.संजय शिरसाठ, आ.रमेश बोरनारे, डॉ.दिनेश परदेशी, पंकज ठोंबरे आदींसह तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मोदींचे काम बगून मनसेने पाठिंबा दिला. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने देशात मोदी यांची तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात संदीपान भूमरे विजयी होणार आहेत. त्यामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भूमरे यांना बळ द्या. श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांना तुम्ही मतदान करणार का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सर्व विरोधक घोटाळेखोर आहेत.

देशासाठी चोवीस-चोवीस तास काम करणारा पंतप्रधान मोदी यांच्या रुपाने देशाला मिळाला आहे. त्यांच्याच हातामध्ये देश मजबूत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राहुल गांधी परदेशात जावून पंतप्रधानांची, देशाची बदनामी करतात. भारत जोडो नावाने भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे, तो पाकिस्तानची भाषा बोलतो. म्हणून हिंदुस्थानमधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे. या काँग्रेसची धुळधाण केली पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

खैरे व ठाकरेंना आम्ही सांभाळले…

संदीपान भूमरे म्हणाले, खैरे व ठाकरेंनाला आम्ही सांभाळले वीस वर्ष फक्त आम्ही मदत करत होतो म्हणून ते निवडून येत होते. आता आमची निशानी धनुष्यबान आहे. तर, खैरेची टेंभा निशानी, मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाचा सर्वांगिण विकास होत आहे. विरोधकांकडे कुठलाच अजेंडा नाही, ते दिशाहीन आहेत. देशाचे भविष्य मोदी यांच्या हातामध्ये सुरक्षित असल्याने मला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भूमरे यांनी केले.

नांदुरमधमेश्वरला पाणी सोडले जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही संभाजीनगरहून वैजापूरला येताना गाडीत संदीपान भूमरे, संजय सिरसाठ व भागवत कराड म्हणाले की, नांदुर मधमेश्वरला पाणी सोडायचे. मी लगेच फोन केला अन् त्यांना सांगितलं पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये. आणि ते पाणी सोडले जाईल असे शिंदे म्हणाले.

सध्या वैजापूर व गंगापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच, नांदुर मधमेश्वरला पाणी सोडण्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी सोडले जाईल अशी घोषणा केली. त्यामुळे खरच पाणी मिळेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Back to top button