कोकण : चिपीच्या आकाशात विमान आले अन् घिरट्या घालून परत गेले! | पुढारी

कोकण : चिपीच्या आकाशात विमान आले अन् घिरट्या घालून परत गेले!

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा :   मुंबई विमानतळावरून शनिवारी नियोजित वेळेत टेक ऑफ घेऊन सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावर   12.45 वा. लँडिंग होणारे विमान सिंधुदुर्ग हद्दीत येऊन घिरट्या घालून माघारी परतले. खराब हवामानामुळे विमान लँडिंग करण्याकरिता अडचण येऊ लागल्याने ते विमान परत मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे विमान कंपनीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, विमानसेवा सुरू झाल्यापासून हा प्रकार प्रथमच घडला. त्यामुळे या पावसाळी मौसमात सिंधुदुर्ग विमानतळावरची विमानसेवा सुरळीत राहणार की राम भरोसे राहणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. या प्रकाराने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

9 ऑक्टोबर 2021 पासून एअर अलायन्सचे 72 प्रवासी क्षमतेची विमानसेवा मुंबई- सिंधुदुर्ग मार्गावर सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या महिन्याभरात दोन ते तीनवेळा मुंबईहून येणारे विमान खराब हवामानामुळे रद्द करावे लागले. शनिवारी तर ते विमान प्रवाशांसह मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्ग विमानतळावर येण्यासाठी आकाशात झेपावले आणि सिंधुदुर्ग हद्दीत नियोजित वेळेतही आले. पण खराब हवामानामुळे विमान सिंधुदुर्ग विमानळाच्या धावपट्टीवर उतरू शकले नाही.

अखेर पायलटने घिरट्या घालत ते विमान पुन्हा मुंबईकडे मार्गस्थ केले. विशेष म्हणजे प्रवाशांनी भरलेले विमान खराब हवामानामुळे परत नेण्याची घटना विमानसेवा सुरू झाल्यापासून गेल्या 9 महिन्यात प्रथमच घडली आहे. अचानक विमानाचे लॅन्डिंग रद्द झाल्याने मुंबईला जाणार्‍या प्रवाशांचे मोठे हाल झाले. विमानसेवा रद्द झाल्यामुळे राजकीय घडामोडीकरिता मुंबईत वेळेत पोचण्यासाठी विमानतळावर आलेल्या अनेक राजकीय पदाधिकार्‍यांची गैरसोय झाली. अखेर काहींनी रेल्वेने तर काहींनी गोवा येथून मुंबईत जाणे पसंत केले. विमानसेवा देणार्‍या कंपनीने तिकिटाचे पैसे प्रवाशांच्या खात्यावर तत्काळ जमा केल्याचे विमान कंपनीच्या अधिकार्‍यांने सांगितले.

लॅन्डिंगसाठी अद्ययावत उपकरणांची प्रतीक्षा
केंद्राच्या ‘उडाण’ योजनेतून ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून चिपी विमानतळ आयआरबी कंपनीच्या वतीने विकसीत करण्यात आला आहे. पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा प्रकल्प पूरक आहे. विशेष म्हणजे या विमानसेवेला सिंधुदुर्ग व मुंबईस्थित चाकरमान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अलिकडे विमान अचानक रद्द होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. चिपी विमानतळ समुद्र किनारी आहे. समुद्र किनारी ढग खाली असल्याने तसेच धुके असल्याने दृश्यमानता कमी मिळते,त्यामुळे पायलटला धावपट्टी दिसत नाही. दृश्यमानता वाढविण्यासाठी आवश्यक उपकरणे (विमानतळावर लॅन्डिंगसाठी अद्ययावत उपकरणे) आयआरबी कंपनीच्या वतीने बसविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विमान वारंवार रद्द होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

Back to top button