करमाळा : ‘विद्यार्थांच्या सोयीसाठी मुक्‍कामी बस सुरू करा’ | पुढारी

करमाळा : ‘विद्यार्थांच्या सोयीसाठी मुक्‍कामी बस सुरू करा’

करमाळा , पुढारी वृत्तसेवा :  कोरोना कालावधीनंतर शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. मात्र, बस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेला जाणे अवघड झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुक्‍कामी बससेवा सुरू करावी, अशी मागणी युवासेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी करमाळा आगारप्रमुख अश्‍विनी किरगत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोरोना नियंत्रणासाठी सरकारलादेखील मोठ्या प्रमाणात खर्च सहन करावा लागला. एस.टी. महामंडळालादेखील कोरोनाचा प्रचंड मोठा फटका सहन करावा लागला. कोरोनातून सावरल्यानंतर एस.टी. कर्मचार्‍यांकडून पुकारलेल्या संपामुळे एस.टी.चे चाक पूर्णपणे तोट्यात रुतून बसले होते. परंतु कोरोना व संपातून सावरत एस.टी. आता पूर्वपदावर येत आहे.

एस.टी. हीच खरी महाराष्ट्राची मुख्यत्वेकरून ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. आता कोरोनानंतर पुन्हा नव्याने शाळा सुरू होत आहेत. गाव-खेड्यातून आठ वाजता करमाळा शहरात खासगी शिकवणी तसेच कॉलेजसाठी विद्यार्थ्यांना यावे लागत आहे. त्यांना एस.टी. शिवाय दुसरा पर्याय नाही. विद्यार्थांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून मुक्कामी गाड्या त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. कारण, दुपारी पाच वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या मुक्‍कामी गाड्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवत असतात व सकाळी पुन्हा वेळेवर शाळेत घेऊन येत असतात. विद्यार्थ्यांबरोबरच अन्य प्रवाशांचीही सोय होणार आहे.

या निवेदनावर युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान यादव, दादासाहेब तनपुरे, युवती अध्यक्ष वैष्णवी साखरे, करण काळे, अतुल सांगडे यांच्या सह्या आहेत.

Back to top button