सोलापूर : डॉक्टर दाम्पत्यास मारहाण प्रकरणी २८ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

सोलापूर : डॉक्टर दाम्पत्यास मारहाण प्रकरणी २८ जणांवर गुन्हा दाखल

टाकळी सिकंदर / मोहोळ, पुढारी वृत्तसेवा : रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही म्हणून जमावाने डॉक्टर दांपत्याला शिवीगाळ, मारहाण करुन रोख रक्कम नेल्याची घटना गुरुवारी (दि २ जून) मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावात घडली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात आठ मुख्य आरोपींसह अन्य २० अशा एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल बनसोडे, दीपक वाघमारे, विश्वास वसेकर, संजय सोनटक्के, गणेश शेटे, अमोल गवळी, कसबे, कदम, व अन्य २० लोक (रा. टाकळी सिकंदर ता. मोहोळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत मोहोळ पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, डॉ. प्रेरणा बाबर व डॉ. संतोष दिनकर बाबर यांचे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे अनया नावाचे हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलची वेळ सकाळी १० ते रात्री ९ पर्यंतची आहे. त्यामुळे फक्त दिवसाच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले जाते. डॉ. संतोष बाबर हे रात्री पंढरपूर येथील एका रुग्णालयात सेवा देत असल्यामुळे रात्री रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जात नाही. १ जून रोजी डॉ. बाबर हे रात्री साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे पंढरपूरला निघाले होते. यावेळी टाकळी गावातील अतुल बनसोडे हा व्यक्ती त्याच्या मुलाला उपचारासाठी अनया हॉस्पीटलमध्ये घेऊन आला होता. डॉक्टरांना फोन केला असता, त्यांनी बाहेर असल्याचे सांगून दुसऱ्या दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला.

२ जून रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबर हे आपल्या हॉस्पीटलमध्ये आले. यावेळी त्यांना बाह्यरुग्ण कक्षाचे लॉक तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी मदतणीस शरण गावडे व अरविंद वाघमारे यांच्याकडे चौकशी केली असता, गावातील अतुल बनसोडे याने आठ ते दहा जणांसह बाह्यरुग्ण कक्षाचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि डॉक्टरांच्या दोन्ही मदतनिसांना मारहाण करून काउंटरमध्ये ठेवलेले आठ ते दहा हजार रुपये घेऊन गेल्याचे समजले.

त्यामुळे डॉक्टर बाबर यांनी अतुल बनसोडे याला फोन केला असता, त्याने फोन उचलला नाही. थोड्या वेळाने डॉक्टरांचे मदतनीस शरण गावडे याच्या मोबाइलवर अतुल बनसोडे याचा दुसऱ्या नंबरवरून फोन आला. यावेळी डॉक्टरांनी त्याला मी दवाखान्यात नसताना माझ्या दवाखान्यात गोंधळ का घातला? अशी विचारणा केली. त्यानंतर दुपारी बारा वाजता अतुल बनसोडे हा पुन्हा एकदा २० ते २५ लोकांना घेऊन अनया हॉस्पिटलमध्ये आला. यावेळी त्याने व त्याच्या साथीदारांनी डॉक्टरांना मारहाण केली, त्यांच्या डॉक्टर पत्नीला अश्लील शिवीगाळ केली व मदतनिसांना देखील मारहाण केली.

या प्रकरणी डॉ. संतोष बाबर यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वरील आठ जणांसह एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button