Rinku Bansode Murder Case : ‘त्या’ हल्लेखोरास पाच दिवस पोलिस कोठडी | पुढारी

Rinku Bansode Murder Case : ‘त्या’ हल्लेखोरास पाच दिवस पोलिस कोठडी

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : मोरगाव महावितरण कार्यालयातील महिला कर्मचारी रिंकू बनसोडे यांच्यावर बुधवारी (दि. 24) एका माथेफिरू ग्राहकाने कोयत्याने हल्ला करीत त्यांचा खून केला. या हल्लेखोराचे नाव अभिजित पोटे असे असून त्याला पोलिसांनी बुधवारीच अटक केली होती. पोटे याला पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले असता त्याला पाच दिवसांची (दि. 30 एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सुपेचे पोलिस निरीक्षक वसंत वाघोले यांनी दिली.

मोरगाव येथील महावितरण कार्यालय शासकीय विश्रामगृहानजीक आहे. येथे बुधवारी महिला कर्मचारी रिंकू बनसोडे यांच्यावर अभिजित पोटे याने कोयत्याने हल्ला करून त्यांचा खून केला. यामुळे मोरगाव येथील विद्युत कर्मचारी भीतीच्या सावटाखाली आहेत.
दरम्यान हे कार्यालय सुपा पोलिसांनी सील केले आहे. या कार्यालयातील सुमारे 11 कर्मचाऱ्यांची तात्पुरती व्यवस्था कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या 11 केव्हीच्या ऑपरेटर कार्यालयामध्ये करण्यात आली आहे.

कर्मचार्‍यांमध्ये हळहळ व्यक्त

ही घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आहे. कर्मचार्‍यांवर होणार्‍या अशा हल्ल्यामुळे जनसेवा कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या किंवा अडचणीच्या वेळी विद्युतपुरवठा खंडित झाल्यास ताबडतोब आमच्यामार्फत हा पुरवठा सुरळीत केला जातो. मात्र अशा घटना घडत असल्यास आम्हाला अत्यंत वेदना होत आहेत. रिंकू बनसोडे या मनमिळाऊ होत्या. कोणाचे कधी मन
दुखावेल, असे त्यांचे विचार किंवा वागणे नव्हते. त्यांच्याबाबत अशी घटना घडल्याने आम्हा सर्वांना अत्यंत वेदना होत असल्याचे सांगत कर्मचार्‍यांनी त्यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त केली.

उपकार्यकारी अभियंता लातूरला रवाना

खून झालेल्या महिला कर्मचारी रिंकू बनसोडे या मूळ लातूर येथील आहेत. त्यामुळे त्यांचा मृतदेह लातूर येथे नेण्यात आला. सोमेश्वरचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण हे रिंकू बससोडे यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी लातूर येथे रवाना झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button