Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाडचे सलग दुसरे शतक | पुढारी

Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाडचे सलग दुसरे शतक

राजकोट ; वृत्तसंस्था : सलामीवीर ऋतुराज गायकवाड (नाबाद 154) शतक व यश नहर (52) यांच्या अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेतील (Vijay Hazare Trophy) एलाईट ‘ड’ गटामधील सामन्यात छत्तीसगडचा 8 विकेटस्ने 18 चेंडू बाकी असताना पराभव केला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय असून, काल बुधवारी मध्य प्रदेशला पराभूत केले होते. दरम्यान, मुंबई व विदर्भनेही गुरुवारी विजय मिळविले.

छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 7 बाद 275 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. अमनदीप खरे (82) शशांक सिंग (63) यांनी अर्धशतकी खेळी साकारली. विजयासाठी 276 धावांचे टार्गेट नजरेसमोर ठेवून उतरलेल्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड व यश नहर यांनी 120 धावांची शतकी सलामी दिली.

नहरने 52 धावांचे योगदान दिले. तर, ऋतुराजने दीडशतकी खेळी करताना 143 चेंडूंत 14 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 154 धावांची खेळी करीत संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला. ऋतुराजने बुधवारी मध्य प्रदेशविरुद्ध 136 धावांची शतकी खेळी केली होती. (Vijay Hazare Trophy)

दरम्यान, दुसर्‍या एका सामन्यात मुंबईने बडोद्यावर डकवर्थ-लुईस नियमावलीनुसार 13 धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने 210 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मुंबईची 23 षटकांत 3 बाद 100 अशी स्थिती असताना सामना थांबवण्यात आला. शेवटी मुंबईला 13 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. मुंबईच्या यशस्वी जैस्वालने नाबाद 41 धावा काढल्या.

दरम्यान, आणखी एका सामन्यात विदर्भने आंध्र प्रदेशवर 50 चेंडू बाकी असताना 8 विकेटस्ने विजय मिळविला. आंध्र प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 287 धावा काढल्या होत्या. आंध्रच्या ज्ञानेश्वरने 93, अंबाती रायडूने 53 धावांचे योगदान दिले. त्यानंतर विदर्भाने अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 41.4 षटकांत 288 धावा काढून विजय मिळविला. विदर्भच्या वतीने अथर्व तैडेने नाबाद 164 धावांची खेळी साकारली. त्याने 123 चेंडूंत 15 चौकार व 5 षटकार खेचले.

Back to top button