GT vs KKR : पावसाने गुजरातला ‘बुडवले’ | पुढारी

GT vs KKR : पावसाने गुजरातला ‘बुडवले’

अहमदाबाद, वृत्तसंस्था : अहमदाबादमध्ये आलेल्या वादळी पावसात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यातील सामना वाहून गेला. सामना रद्द झाल्याने गुजरात टायटन्स अधिकृतरीत्या आयपीएल 2024 च्या प्ले ऑफमधून बाहेर पडली आहे.

सामना रद्द झाल्याने काय?

  • केकेआरने 19 गुणांसह गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये स्थान पक्के केले.
  • मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स यांच्यानंतर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा गुजरात टायटन्स तिसरा संघ ठरला.
  • प्ले ऑफमध्ये एन्ट्री करणारा पहिला संघ कोलकाता नाईट रायडर्स

इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या प्ले ऑफमध्ये एन्ट्री करणारा पहिला संघ कोलकाता नाईट रायडर्स याचे क्वालिफायर 1 सामना खेळणे पक्के झाले आहे. गुजरात टायटन्सविरुद्धची सोमवारची अहमदाबाद येथील लढत पावसामुळे रद्द करावी लागली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिले गेले. यामुळे केकेआरचे 19 गुण झाले आहेत आणि राजस्थान रॉयल्स वगळता अन्य कोणताही संघ एवढ्या गुणांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे केकेआर क्वालिफायर 1 साठी पात्र ठरला आहे.

गुजरात टायटन्सला मागील 5 सामन्यांत 3 पराभवांचा सामना करावा लागला आहे, तेच केकेआरने पाचपैकी 4 सामने जिंकले आहेत. गुजरातसाठी हा सामना महत्त्वाचा होता; परंतु पावसाने त्यांच्या मार्गात खोडा घातला. विजांच्या कडकडाटांसह अहमदाबाद येथे जोरदार पाऊस सुरू राहिला. पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती; परंतु पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. 9.15 वाजता पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि त्यामुळे हळूहळू षटकेही कमी होऊ लागली होती. 10.15 वाजता अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिले गेले.

Back to top button