MI vs CSK : प्रतिस्पर्धा जुनीच, नेतृत्व नवे; मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हायव्होल्टेज सामना आज | पुढारी

MI vs CSK : प्रतिस्पर्धा जुनीच, नेतृत्व नवे; मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हायव्होल्टेज सामना आज

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आयपीएलमधील सर्वात हायव्होल्टेज लढत म्हणून ज्या सामन्याकडे पाहिले जाते, तो मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघांतील प्रतिस्पर्धा ही जुनी असली, तरी यंदाच्या हंगामातील लढत महेंद्रसिंग धोनी विरुद्ध रोहित शर्मा अशी लढत नाही, तर दोन्ही संघांचे नेतृत्व नवे आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या आणि चेन्नई सुपर किंग्जने ऋतुराज गायकवाड यांच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. त्यामुळे या ‘जनरेशन नेक्स्ट रायव्हली’ ची विजयी सुरुवात कोण करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सलग तीन पराभवांनंतर माजी विजेता मुंबई इंडियन्सना विजयाची हॅ‌ट्ट्रिक साधण्याची संधी चालून आली आहे. यजमान संघ त्याच उद्देशाने वानखेडे स्टेडियमवर पाऊल ठेवतील. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. यंदाच्या हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने पाचपैकी दोन सामने जिंकलेत. हे दोन्ही विजय घरच्या मैदानावरील आहेत. सलग विजयांमुळे यजमान संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. चेन्नई विरुद्धचा सामना हा मुंबईचा घरच्या पाठीराख्यांसमोरील सलग चौथा सामना आहे. यजमानांना प्रमुख खेळाडूंच्या तंदुरुस्तीची चिंता नाही. त्यातच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सर्व प्रमुख फलंदाजांनी फॉर्म मिळवला. तरीही रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कर्णधार हार्दिक पंड्या, टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड तसेच जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झीकडून त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे.

चेन्नईने ५ सामन्यांत तीनदा बाजी मारली आहे. मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर मात करताना त्यांनी दोन पराभवांची मालिका खंडित केली. कर्णधार ऋतुराजसह रचिन रवींद्र आणि शिवम दुबेवर फलंदाजीची फळीची भिस्त असली, तरी लोकल बॉय अजिंक्य रहाणेकडून संघाच्या अपेक्षा वाढल्यात.

Back to top button