Virat Kohli Golden Duck : विराटच्या नावावर या ‘नामुष्कीजनक’ रेकॉर्डची नोंद; सचिनला टाकले मागे | पुढारी

Virat Kohli Golden Duck : विराटच्या नावावर या 'नामुष्कीजनक' रेकॉर्डची नोंद; सचिनला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. बंगळूरुच्‍या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विराट खाते न उघडताच बाद झाला. इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने 16 चेंडूत 29 धावांची खेळी केली होती. बंगळुरूमध्ये तो मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते; पण तो शून्यावर बाद होवून पॅव्हेलियनमध्ये परतला. (Virat Kohli Golden Duck) यामुळे आता विराटच्‍या नावावर एका नामुष्‍कीजनक रेकाॅर्डची नाेंद झाली आहे. त्‍याचे टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकले आहे.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल सहा चेंडूत चार धावा करून बाद झाला. यशस्वीला फरीद अहमदने मोहम्मद नबीच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर विराट फलंदाजीसाठी क्रिजवर आला. कोहली येताच मैदानातील चाहत्यांनी ‘कोहली-कोहली’ असा जयघोष केला; पण विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि मैदानावर एकच सन्‍नाटा पसरला. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. फरीदच्या चेंडूवर इब्राहिम झद्रानने झेल घेतला. (Virat Kohli Golden Duck)

विराट T-20 मध्‍ये पहिल्यांदाच ‘गोल्डन डक’

विराट कोहली पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात ‘गोल्डन डक’चा (पहिल्या चेंडूवर बाद होणे) बळी ठरला. ही पाचवी वेळ होती जेव्हा कोहलीला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये खाते उघडता आले नाही. 2017 मध्ये गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट पहिल्यांदा शून्यावर बाद झाला होता. यानंतर 2018 मध्ये डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. 2021 मध्ये तो अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर 2022 मध्ये दुबईत श्रीलंकेविरुद्ध एकही धाव न काढता तो बाद झाला. कोहलीला ‘गोल्डन डक’ म्हणून बाद करणारा फरीद अहमद हा पहिला गोलंदाज ठरला.

नामुष्‍कीजनक विक्रमचा विराटच्या नावावर नाेंद

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी20) सर्वाधिकवेळा शून्‍यवर बाद होणारा तो भारताचा फलंदाज ठरला आहे. त्‍याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन ३४ वेळा शून्यावर बाद झाला. भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत असे 33 वेळा घडले आहे. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग त्याच्या कारकिर्दीत ३१ वेळा शून्यावर बाद झाला.

हेही वाचा :

Back to top button