Kalsubai Peak : तानाजीने अवघ्या ३८ मिनिटांत सर केले कळसुबाई शिखर | पुढारी

Kalsubai Peak : तानाजीने अवघ्या ३८ मिनिटांत सर केले कळसुबाई शिखर

नाशिक : आनंद बोरा

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची (Kalsubai Peak) चढाई अवघ्या ३८ मिनिटे १४ सेकंदांमध्ये सर करून गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा विक्रम केला आहे. यापूर्वी विक्रम बारी गावातील गिर्यारोहक साजन भांगरे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये कळसुबाई शिखर ४२ मिनिटांमध्ये सर केल्याची नोंद होती.

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून, त्याची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे. तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे ९०० मीटर आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण हे शिखर चढाईसाठी गिर्यारोहकांना दोन ते तीन तास लागतात. तानाजी केकरे महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे प्रमुख गिर्यारोहक आहेत. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी त्यांनी हा विक्रम केला आहे. (Kalsubai Peak)

अकोले तालुक्यात पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उभ्या ठाकलेल्या या शिखराची चढाई म्हणजे भल्या भल्या गिर्यारोहकांची दमछाक होते. त्याच्या चढाईची आखणी गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र रेंजर्स संस्थेने केली. तानाजी व टीमने ११ जानेवारीला बारी या गावी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच चढाईची तयारी केली. रोजचा सराव व प्रचंड मेहनतीच्या जोरावर तानाजीने हे शिखर विक्रमी वेळेत सर केले. या मोहिमेत महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे प्रदीप गायकवाड, जयेश हरड, अखिल सुळके, रामदास ठवळे, समीर कोंदे, सुनील येवले, मिलन गायकवाड, गिरीश पाटणकर, गौतम डावखर आणि गौतमी येवले आदी सहभागी झाले होते. (Kalsubai Peak)

संबंधित बातम्या

यापूर्वीही कठीण सुळक्यांवर चढाई 

तानाजी केकरे हे गिर्यारोहण क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी बेसिक तसेच अॅडव्हान्स रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच सुवर्णपदक संपादन केले आहे. ते आंबेवाडी गावाचे रहिवासी असून, एक अनुभवी ट्रेक गाइड म्हणूनदेखील कार्यरत आहेत. याआधी लिंगाना हा अवघड श्रेणीतील सुळका ११ मिनिटे २२ सेकंदांत तसेच अलंग मदन कुलंग हे दुर्गत्रिकुट ३ तास १२ मिनिटांत सर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तानाजी यांनी याआधी वजीर, वानरलिंगी, कळकराई, तैलबैला यासारख्या अत्यंत कठीण अशा सुळक्यांवर यशस्वीरीत्या चढाई केली आहे.

लिंगाना, अलंग मदन कुलंग आदी किल्ल्यांवर यशस्वी चढाई केल्यानंतर महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजला जाणारे कळसुबाई शिखर खुणवत होते. मला राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून चढाई पूर्ण करायची होती. ती पूर्ण केल्याचा आनंद आहे.

– तानाजी केकरे, गिर्यारोहक

हेही वाचा :

Back to top button