Rahul Dravid : क्रिकेटमध्ये विजयाची खात्री नसते, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दडपण असेल | पुढारी

Rahul Dravid : क्रिकेटमध्ये विजयाची खात्री नसते, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दडपण असेल

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील ही लढत बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. गेल्या काही आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता किवी संघाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

‘उपांत्य फेरीच्या सामन्यात दडपण असेल’

भारतीय संघाने रविवारी (12 नोव्हेंबर) बंगळूरमध्ये झालेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 160 धावांनी विजय मिळविला. या सामन्यानंतर संघाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी स्टार स्पोर्ट्स वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडचे संघ दुस-यांदा भिडणार आहेत. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. पण उभय संघांमध्ये दुसरी लढत ही उपांत्य फेरीत होत आहे. मात्र, या सामन्याबाबत आमचा दृष्टिकोन अजिबात बदलणार नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की हा बाद फेरीचा सामना आहे आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात थोडे दडपण असेल हे आपण स्वीकारले पाहिजे. तुम्ही फक्त तुमची सर्वोत्तम तयारी करू शकता आणि आम्ही ते करत आहोत.’

श्रेयस अय्यरचे केले कौतुक

आपल्या संभाषणादरम्यान, राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी नेदरलँड्सविरुद्ध चमकदार फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरचे कौतुक केले. अय्यरच्या कामगिरीबाबत ते म्हणाले की, श्रेयस हा आमच्या मधल्या फळीचा कणा आहे. गेल्या 10 वर्षात चौथ्या क्रमांकावर चांगला खेळाडू शोधणे आमच्यासाठी खूप कठीण गेले आहे, हे सर्वांना माहीत आहे. श्रेयसने आपल्या खेळात सुधारणा करून आपली कुवत सिद्ध केली आहे. तो आता संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे यात शंका नाही.’

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ

आत्तापर्यंत भारतीय संघाने वेगवेगळ्या आयसीसी स्पर्धांमध्ये तीन वेळा न्यूझीलंडविरुद्ध बाद फेरीचे सामने खेळले आहेत आणि त्या सर्वांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच न्यूझीलंडविरुद्ध 2019 च्या उपांत्य फेरीतील पराभवाची आठवण करून देत द्रविड यांनी भूतकाळातील अनुभवांमधून शिकण्यावर भर दिला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जेव्हा सगळे चांगले चाललेले असते तेव्हा सर्वांचे कौतुक होते. चाहते खेळाडूंना डोक्यावर घेतात. पण एका पराभवाने सगळेच गणित बिघडते. खेळाडूंवर सडून टीकेला सामोरे जावे लागते. उटसुट सगळेजण तुम्हाला काही कळत नाही, असे टोमणे मारले जातात.’

Back to top button