Virender Sehwag ICC Hall of Fame | ‘या’ भारतीय महिला क्रिकेटरसह वीरेंद्र सेहवागला ICC चा मोठा सन्मान, ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश | पुढारी

Virender Sehwag ICC Hall of Fame | 'या' भारतीय महिला क्रिकेटरसह वीरेंद्र सेहवागला ICC चा मोठा सन्मान, 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

पुढारी ऑनलाईन : भारताचा माजी स्टार सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame) समावेश करण्यात आला आहे. एक दशकाहून अधिक काळातील उत्कृष्ट क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याला हा सन्मान देण्यात आला आहे. सेहवागसह भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी आणि श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणारे अरविंद डी सिल्वा यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

वीरेंद्र सेहवागने आक्रमक खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली. सेहवाग फलंदाजी करत असताना कधीच कंटाळवाणा क्षण आला नाही. त्याने प्रत्येकवेळी त्याचा नैसर्गिक खेळ केला. त्याने कसोटी आणि एकदिवसीय स्तरावर जगातील दिग्गज गोलंदाजांवर सतत वर्चस्व गाजवले, असे ICC ने म्हटले आहे. (Virender Sehwag ICC Hall of Fame)

सेहवागच्या नावावर अनेक जागतिक विक्रम

सेहवागच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आहेत. २००८ मध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने वेगवाग ३१९ धावा केल्या होत्या. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम अद्याप कोणालाही करता आलेला नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा त्रिशतकी खेळी करणारा जगातील फक्त चार खेळाडूंपैकी तो एक आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या सेहवागने २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक ठोकले होते. कसोटीत त्याने ४९.३४ च्या सरासरीने धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट ८२.२३ आहे.

सेहवागने २०११ मध्ये इंदूर येथे वेस्ट इंडिज विरुद्ध स्फोटक खेळी करत २१९ धावा केल्या होत्या. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय द्विशतक ठोकणारा सेहवाग हा सचिन तेंडुलकर नंतरचा दुसरा फलंदाज आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक आणि कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणाऱ्या जगातील फक्त दोन खेळाडूंपैकी तो एक आहे. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ख्रिस गेलनेही अशी कामगिरी केली होती.

ज्युनियर खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर सेहवागला एप्रिल १९९९ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्यांदा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. (Virender Sehwag ICC Hall of Fame)

मोहालीमध्ये भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला संधी मिळाली होती. पण सेहवाग सातव्या क्रमांकावर येऊन फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यावेळी त्याला शोएब अख्तरने एलबीडब्ल्यू आउट केले होते.

जुलै २००२ मधील लॉर्ड्स कसोटीत सेहवागला दमदार क्रिकेट कारकिर्दीसाठी टर्निंग पॉईंट मिळाला. त्याने ९६ चेंडूत ८४ धावांच्या खेळीसह इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपून काढले होते. त्यानंतर २००२ मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट २७१ धावा केल्या.

डायना एडुलजींची कारकीर्द

भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन (WCAI) ची स्थापना १९७४ मध्ये करण्यात आली. त्यानंतर डायना एडुलजी यांना संधी मिळाली. दोन वर्षांनंतर १९७६ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध भारताच्या पहिल्या अधिकृत कसोटी सामन्यात त्यांचा समावेश होता. १९७८ पर्यंत एडुल्जी भारतीय महिला संघाच्या कर्णधार होत्या. १९८३ मध्ये एडुलजींना अर्जुन पुरस्कार आणि त्यानंतर २००२ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.

Back to top button