‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणाला, ‘विराट चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी परफेक्ट’ | पुढारी

'मिस्टर ३६० डिग्री' म्हणाला, 'विराट चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी परफेक्ट'

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक २०२३ सुरू होण्यास फारसा वेळ राहिला नसताना भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यास कोण जाणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे पुनरागमन झाल्याने टीम इंडियाला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी ‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) ने विराट कोहली चौथ्या क्रमांकासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

विराट कोहलीची डाव सावरण्याची क्षमता त्याला विश्वचषकात भारताच्या ४ थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी परिपूर्ण आहे. कोहलीला त्याचे तिसऱ्या क्रमांकाचे स्थान आवडते, परंतु त्याने विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ‘टीम मॅन’ बनण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे डिव्हिलियर्सने म्हटले आहे.

‘चौथ्या क्रमांकासाठी कोहली योग्य’

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “आम्ही अजूनही भारतासाठी नंबर- ४ वर खेळणार फलंदाज कोण असेल याबद्दल बोलत आहोत. मी काही अफवा ऐकल्या आहेत की विराट कदाचित ते स्थान घेऊ शकेल. तसं झालं तर मी त्याचा समर्थक असेल. मला वाटते की विराट नंबर- ४ वर योग्य आहे. तो डाव सावरू शकतो. मधल्या फळीत कोणत्याही प्रकारची भूमिका बजावू शकतो. आम्हाला माहित आहे की त्याला तिसरे स्थान आवडते. त्यामुळे तो तसे करेल की नाही माहित नाही.”

विराट कोहलीचे ४ क्रमांकावरील आकडे

चौथ्या क्रमांकावर जाऊन फलंदाजी करताना कोहलीने ५५.२१ च्या सरासरीने १७६७ धावा केल्या आहेत. त्याने ९०.६६ च्या स्ट्राइक रेटने सात शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने २० डावात ४७.३५ च्या सरासरीने दोन शतकांसह ८०५ धावा केल्या आहेत. श्रेयसच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ मजबूत होईल.

हेही वाचा : 

 

Back to top button