Asia Cup : संघ निवड झाली, काही प्रश्न संपले, काही नव्याने उठले… | पुढारी

Asia Cup : संघ निवड झाली, काही प्रश्न संपले, काही नव्याने उठले...

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आशिया (Asia Cup) चषकासाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेवर या घोषणेने पडदा पडला आहे. या संघात जवळपास सर्वच प्रमुख खेळाडू निवडण्यात आले आहेत. निवड समितीने बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची ही मोठ्या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच केलेली संघ निवड आहे. संघ निवडीबाबत पत्रकार परिषद खूप दिवसांनी घेण्यात आली. आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या निवडीने काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असली, तरी काही प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत.

तिलक वर्माची सरप्राईज एन्ट्री (Asia Cup)

हैदराबादचा डावखुरा अष्टपैलू फलंदाज तिलक वर्मा हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघातून खेळतो. या हंगामातील त्याच्या चमकदार कामगिरीवरून रोहित शर्माने तिलक वर्मा लवकरच भारतीय संघातून खेळताना दिसेल, असे वक्तव्य केले होते. तिलक वर्माला वेस्ट इंडिज दौर्‍यात टी-20 संघात संधी मिळाली. त्याने या मालिकेत दणकेबाज खेळी करून आपली पात्रता सिद्ध केली. सध्या तो आयर्लंड दौर्‍यात खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यांत तो अपयशी ठरला आहे. त्याच्याकडे फक्त सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असताना त्याला आशिया चषकासाठी एकदिवसीय संघात निवडण्यात आले; मग अनेक दिवस देशांतर्गत स्पर्धा गाजवणार्‍या खेळाडूंना का डावलले गेले? या स्पर्धेत तो चांगला खेळला तर वर्ल्डकप संघात तो दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

के. एल. राहुल अजूनही अनफिट

पत्रकार परिषदेत के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर आगरकर यांनी सांगितले की, राहुल हा अजूनही शंभर टक्के फिट नाही. त्याला नवीन दुखापत झाली आहे. तो जुन्या दुखापतीतून सावरत असतानाच ही नवी समस्या उद्भवली आहे. त्यामुळे तो पहिल्या एक-दोन सामन्यांत खेळू शकणार नाही. अशावेळी प्रश्न उठतो की, जर राहुल पूर्ण फिट नाही. सामना न खेळताच जखमी होत आहे, तर त्याला संघात सहभागी करण्याची इतकी घाई का?

चहलचे आंतरराष्ट्रीय करिअर संपले? (Asia Cup)

गेली काही वर्षे भारतीय संघात फिरकीची धुरा सांभाळणार्‍या यजुवेंद्र चहलची आशिया चषकासाठी निवड करण्यात आली नाही. त्याच्याऐवजी अक्षर पटेलला पसंती देण्यात आली. आगरकर यांनी याबाबत सांगितले की, संघात एकाचवेळी दोन रिस्ट स्पिनर्स ठेवणे शक्य नाही. अक्षर पटेल हा गोलंदाजीसोबत आश्वासक फलंदाजही आहे; तर कुलदीप यादव हा आता परिपक्व झाला आहे. त्यामुळे चहलला बाहेर करावे लागले. यातून एक गोष्ट निश्चित झाली की, वर्ल्डकप संघातही चहलला स्थान मिळणार नाही. दुसरीकडे, रवी बिष्णोईसारखा ताज्या दमाचा फिरकी गोलंदाज वेटिंगवर आहे. त्यामुळे चहलचे आंतरराष्ट्रीय करिअर संपल्यातच जमा आहे.

Back to top button