कपिलदेव म्हणाले, बुमराहवर वेळ वाया जातोय | पुढारी

कपिलदेव म्हणाले, बुमराहवर वेळ वाया जातोय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ‘बुमराहसोबत काय झाले होते? त्याने खेळण्यास सुरुवात केली होती आणि आपल्याला विश्वास दाखवला; परंतु तो जर वर्ल्डकप खेळणार नसेल, तर आपण त्याच्यामागे वेळ वाया घालवतोय,’ असे भारताचे वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिलदेव यांनी म्हटले आहे.

कपिलदेव यांनी भारतीय खेळाडूंच्या सततच्या दुखापतींवर टीका केली आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत भारतात वन डे वर्ल्डकप होणार आहे आणि त्यासाठी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाकडे लक्ष लागले आहेत. बुमराहने दोन सत्रांत 10 षटके टाकण्यास सुरूवात केली असल्याची माहिती समोर येत आहे. पण, कपिलदेव यांच्या मते जसप्रीत बुमराहवर आपण वेळ वाया घालवतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या मालिकेत जसप्रीतच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोेके वर काढले अन् त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. आशिया चषक 2022 स्पर्धेला मुकल्यानंतर जसप्रीतच्या पुनरागमनाची बीसीसीआयने घाई केली आणि त्यामुळे त्याला टी-20 वर्ल्डकपलाही मुकावे लागले. त्यामुळे बीसीसीआयवर जोरदार टीका झाली. त्यामुळे बीसीसीआय वन डे वर्ल्डकप स्पर्धेच्या तोंडावर कोणतीच घाई करू इच्छित नाही. पण, कपिलदेव यांच्या मते वर्ल्डकप स्पर्धा महत्त्वाची आहे आणि त्यांनी भारतीय खेळाडूंची दुखापत ज्या प्रकारे हाताळली जाते, यावर नाराजी व्यक्त केली आहे.

कपिलदेव म्हणाले…

आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंच्या दुखापती वाढल्या आहेत. खेळाडू सध्या भारताकडून खेळण्याचे टाळतात; परंतु आयपीएलमधील सर्व सामने खेळतात.
ऋषभ पंत किती चांगला खेळाडू आहे. तो जर असता तर आपले कसोटी क्रिकेट आणखी चांगले झाले असते.

Back to top button