IND vs WI : पहिल्या कसोटीसाठी विंडीजचा संघ जाहीर | पुढारी

IND vs WI : पहिल्या कसोटीसाठी विंडीजचा संघ जाहीर

डॉमिनिका, वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात उद्यापासून डॉमिनिका येथे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. यासाठी विंडीजने 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 140 किलो वजनाचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर डावखुरा फिरकीपटू जोमेल वॅरिकनचे 13 सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. गुडाकेश मोतीच्या दुखापतीमुळे वॅरिकनला संघात स्थान मिळाले आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मोती सध्या पुनर्वसनात आहे. क्रेग ब्रॅथवेट संघाचे नेतृत्व करेल.

डावखुरा फलंदाज कर्क मॅकेन्झी आणि अ‍ॅलिक अथानाज हे दोन नवे चेहरे संघात आहेत. मुख्य निवडकर्ता डेसमंड हेन्स म्हणाले, बांगला देशच्या नुकत्याच झालेल्या ‘अ’ संघाच्या दौर्‍यावर मॅकेन्झी आणि अथानाजे यांच्या फलंदाजीने आम्ही खूप प्रभावित झालो. हे दोन युवा खेळाडू आहेत ज्यांनी चांगली कामगिरी करत मोठ्या परिपक्वतेने खेळत आम्हाला त्यांचा विचार करण्यास भाग पडले. आम्हाला विश्वास आहे की, ते संधीस पात्र आहेत. जेडेन सील्स देखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याचवेळी काईल मेयर्सचाही विचार करण्यात आला, मात्र त्याच्यात काही त्रुटी आहेत आणि त्यामुळे त्याला कसोटी संघात ठेवण्यात आले नाही. (IND vs WI)

पहिल्या कसोटीसाठी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघ : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाज, तेजनारिन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा (विकेटकिपर), शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रीफ, केलर रोच, जोमेल वॅरिकन.

Back to top button