Suryakumar Yadav ने वनडेत स्वत:ला सिद्ध करावे : एबी डिव्हिलियर्स | पुढारी

Suryakumar Yadav ने वनडेत स्वत:ला सिद्ध करावे : एबी डिव्हिलियर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्य राखले पाहिजे, त्याच्यासाठी हे सर्वात मोठे आव्हान असेल. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने निराशा केली आहे. तसे पाहिले तर त्याला वनडे सामने खेळण्याची संधी फारशी मिळाली नाही. मात्र, जे काही सामने तो खेळला त्यात त्याची फलंदाजी सामान्य राहिली आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षी, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 200 किंवा त्याहून अधिक स्ट्राइक रेटने तीन टी-20 शतके झळकावल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चर्चेचा विषय बनला होता. सूर्या सध्या आयसीसी टी 20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 48 टी-20 सामन्यांच्या 46 डावांमध्ये 46.53 च्या सरासरीने आणि 175.76 च्या स्ट्राइक रेटने 1675 धावा तडकावल्या आहेत. यात 3 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, ‘सूर्याची टी 20 मधील फटकेबाजी अविश्वसनीय आहे. तो जे शॉट्स खेळतो तसे फटके मी कधीच मारलेले नाहीत. त्याच्या खेळ पाहण्याचा आनंद निराळाच आहे. पण असे असले तरी त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्याने आपल्या परफॉर्मन्समध्ये सातत्य ठेवावे,’ असा सल्ला त्याने भारतीय फलंदाजाला दिला आहे.

‘सूर्यकुमारसमोर (Suryakumar Yadav) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सातत्य राखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये कसे खेळायचे हे सूर्याने समजून घेणे आवश्यक आहे. तो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करून धावा वसूल करू शकतो. ही त्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे मला वाटते की सूर्याने वेगवेगळे फॉरमॅटमध्ये बॅटींग करताना ‘गीअर्स’ बदलण्यास सक्षम झाले पाहिजे,’ असेही डिव्हिलियर्सने स्पष्ट केले.

सूर्यकुमारने 23 एकदिवसीय सामन्यांच्या 21 डावांमध्ये 24.06 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. 64 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारची कॅरेबियन दौऱ्यासाठी वनडे संघात निवड करण्यात आली आहे. त्याला 3 सामन्यांच्या मालिकेत छाप पाडावीची लागणार आहे.

Back to top button