Ashes 2023 : ऑस्‍ट्रेलियाचा ‘रडीचा डाव’! ‘ॲशेस’ सामन्‍यात नेमकं काय घडलं? | पुढारी

Ashes 2023 : ऑस्‍ट्रेलियाचा 'रडीचा डाव'! 'ॲशेस' सामन्‍यात नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रतिस्‍पर्धी संघाच्‍या फलंदाजांना नामोहरण करण्‍यासाठी अर्वोच्‍च भाषेत बोलायचे. मैदानावर कमेंट पास करायच्‍या अशा प्रकारे रडीचा डाव खेळण्‍यासाठी ऑस्‍ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. आता ॲशेस मालिकेतील ( Ashes 2023 ) दुसर्‍या कसोटी सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने रडीचा डाव खेळत जॉनी बेयरस्‍टो याची विकेट घेतली, असा आरोप इंग्‍लंडच्‍या संघाकडून होत आहे. जाणून घेवूया या सामन्‍यात नेमकं काय घडलं?…

ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या कसोटीत जॉनी बेयरस्टोला ज्‍या पद्धतीने रनआउट करण्‍यात आले. यावरुन इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलिया दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. यावर क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंनीही आपले मत मांडले आहे.

Ashes 2023 : सामन्‍यात नेमकं काय घडलं ?

ॲशेस मालिकेतील दुसर्‍या कसोटीच्‍या पाचव्या दिवशी इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. कर्णधार बेन स्टोक्स आणि बेन डकेट यांच्‍या जोडीने जम बसवला. डकेट बाद झाल्यानंतर जॉनी बेयरस्टो आणि स्टोक्स यांनी भागीदारी सुरू केली, बेयरस्टोने ५२ व्या षटकातील शेवटचा चेंडू सोडला आणि स्टोक्सशी बोलण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला. हे पाहून यष्टीरक्षक कॅरीने चेंडू यष्‍टीला फेकून मारला. नियमांनुसार, हा चेंडू डेड नव्हता आणि ऑस्ट्रेलियाच्या अपीलवर पंचाने बेअरस्टो याला बाद घोषित केले.

Ashes 2023 : बेयरस्टोच्या विकेटवर कोण काय म्हणाले?

जे काही झालं ते क्रिकेटच्‍या नियमानुसार : पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने सामन्यानंतर या प्रकरणावर आपले मत मांडले. तो म्हणाला, “माझ्या मते जे झाले ते क्रिकेटच्‍या खेळाच्या नियमांनुसार झाले आहे. खुद्द बेअरस्टो याने यष्‍टीरक्षण करताना असेच केले आहे. त्याने २०१९ मध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांना अशाच प्रकारे आउट केले हाेते. ही एक सामान्य बाब आहे. याचे पूर्ण श्रेय मी आस्‍ट्रेलियाचा यष्‍टीरक्षक ॲलेक्स कॅरी याला देऊ इच्छितो. त्‍याने क्रिकेटच्‍या नियमांचे पालन केले.

मी खेळ भावनेचा विचार करतो : बेन स्‍टोक्‍स

सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला म्हणाला की, जर मी त्यावेळी क्षेत्ररक्षण करत असताे तर  मी खेळाच्या भावनेचा विचार केला असता.  मला अशा प्रकारे जिंकायचे आहे का, असे कोणी विचारले तर माझे उत्तर नाही असेच असेल.

रविचंद्रन अश्‍विनने केले कॅरीचे समर्थन

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स कॅरीने इंग्लंडच्या बेअरस्टो याला धावबाद केल्याचे समर्थन केले आहे. अश्विन म्हणाला, “आम्ही नियमांनुसार दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करायला हवे, खेळ भावनेवर बोलण्‍यापेक्षा यष्टिरक्षकाची नजर स्टंपवर तेव्हाच असते जेव्हा त्याला किंवा त्याच्या संघाला असे वाटते की, फलंदाज पुन्हा पुन्हा क्रीज सोडत आहे. तेव्‍हा त्‍याची विकेट घेण्‍याची संधी सोडणार नाही.”

या प्रकारासाठी तू नेहमीच लक्षात राहशील : स्टुअर्ट ब्रॉड

बेयरस्टो बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने कॅरीवर शाब्दिक हल्ला चढवला. “यासाठी तू नेहमीच लक्षात राहशील,” असे ताे कॅरीला म्‍हणाला.

ॲलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्स दोषी : मायकेल वॉन

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यासंदर्भात बोलताना म्हणाला, ‘‘खेळ भावनेची नेहमीच चर्चा होते. तुम्ही नेहमी खेळाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. बेयरस्टोला ज्‍या पद्‍धतीने बाद करण्‍यात आले यासाठी मी ॲलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्सला दोष देतो. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत; पण प्रश्न असा पडतो की, पॅट कमिन्सने यासाठी बेयरस्टो याला इशारा दिला होता का?  तू सतत क्रीझ सोडत आहेस, असे ताे बेयरस्टोला सांगू शकला असता, अशी अपेक्षा मायकल वॉन यांनी व्‍यक्‍त केली.

भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने ट्विट केले आहे की, खेळाच्या नियमांनुसार घडणाऱ्या गोष्टी कदाचित खेळाच्या भावनेच्या विरोधात नसतात.

हेही वाचा : 

 

 

Back to top button