CSK vs GT : चेन्नईची अंतिम सामन्यात धडक; गुजरात पराभूत | पुढारी

CSK vs GT : चेन्नईची अंतिम सामन्यात धडक; गुजरात पराभूत

चेन्नई; वृत्तसंस्था : आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने गुजरात टायटन्सवर 15 धावांनी विजय मिळवून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आपल्या 14 सिझनमध्ये चेन्नईने तब्बल दहावेळा फायनल गाठली आहे. यापैकी 4 वेळा त्यांना विजेतेपद मिळाले आहे. या सामन्यात पराभूत झालेल्या गुजरातला फायनलला जाण्याची आणखी एक संधी मिळणार असून त्यासाठी त्यांना एलिमिनेटर लढतीतील विजेत्या संघाबरोबर लढावे लागणार आहे.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 7 बाद 172 धावांत रोखले. ऋतुराजच्या 60 धावांच्या जोरावर चेन्नईने दमदार सुरुवात केली होती. मात्र, तो बाद झाल्यावर चेन्नईचा डाव घसरला. पण गुजरातला हे आव्हान पार करता आले नाही. चेन्नईच्या स्लो पिचवर त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. त्यांचा डाव 157 धावांत आटोपला. वृद्धिमान साहाच्या रूपाने गुजरातची पहिली विकेट नेहमीप्रमाणे लवकर पडली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने स्वत:ला तिसर्‍या क्रमांकावर प्रमोट केले. परंतु अवघ्या 8 धावांवर तो तंबूत परतला. गुजरातने पॉवरप्लेमध्ये फक्त 41 धावा करताना 2 विकेट गमावल्या.

दासून शनाका आणि शुभमन गिल यांनी धावांचा गाडा पळवण्याचा प्रयत्न केला, जडेजाने लागोपाठ दोन धक्के देत गुजरातला पंक्चर केले. शनाका (17) धावांवर तर डेव्हीड मिलर (4) धावांवर बाद झाला. एका बाजूने गळती लागली असताना दुसरी बाजू लावून धरलेला शुभमन गिलचाही संयम ढळला. त्याने दीपक चहरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगवरील कॉन्वेच्या हातात झेल दिला. गिलने 42 धावा केल्या. राहुल तेवटिया (3) हा सुद्धा स्वस्तात बाद झाल्याने गुजरातचा पराभव निश्चित झाला होता. परंतु इम्पॅक्ट प्लेअर विजय शंकर आणि अष्टपैलू राशिद खान यांनी आक्रमक फलंदाजी सुरू केली. त्यामुळे गुजरातसाठी विजयाची छोटीशी आशा जागी झाली. परंतु विजय शंकरला (14) पथिरानाने तंबूत पाठवले. राशिद खानची तडफड (30) तुषार देशपांडेने थांबवली. गुजरातचा डाव 157 धावांत संपुष्टात आला.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जला दर्शन नळकांडेने पहिला धक्का दिला होता. त्याने ऋतुराज गायकवाडला 2 धावांवर बाद केले होते. मात्र, तो चेंडू अम्पायरने नो बॉल दिला अन् ऋतुराजला जीवनदान मिळाले. त्यानंतर ऋतुराजने पुढच्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र, गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी सीएसकेच्या सलामीवीरांना हात खोलण्याची फारशी संधी दिली नाही. चेन्नईने 4 षटकांत 31 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, यानंतर ऋतुराज गायकवाडने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने सीएसकेला 7 व्या षटकात 60 धावांचा टप्पा पार करून दिला होता. दुसर्‍या बाजूने डेवॉन कॉन्वे त्याला सावध फलंदाजी करत साथ देत होता. ऋतुराज गायकवाडने पॉवर प्लेनंतर धावांची गती वाढवत सीएसकेला 10 षटकांत 85 धावांपर्यंत पोहोचवले. 37 चेंडूंत ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, 44 चेंडूंत 60 धावा केल्यानंतर ऋतुराजला मोहित शर्माने बाद करत चेन्नईला 87 धावांवर पहिला धक्का दिला. शिवम दुबे 1 तर अजिंक्य रहाणे 17 धावा करून माघारी गेले. डेवॉन कॉन्वे देखील 34 चेंडूत 40 धावा करून बाद झाला.

दहाव्यांदा अंतिम फेरीत; पाचव्या विजेतेपदाची संधी

चेन्नईने यापूर्वी 9 वेळा आयपीएलची फायनल खेळली आहे. यापैकी 4 वेळा त्यांना विजेतेपद मिळाले आहे, तर 5 वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यंदा फायनलमध्ये पोहोचण्याची ही त्यांची दहावी वेळ आहे.

हेही वाचा; 

Back to top button