हिंगोली बाजार समिती सभापतिपदी राजेश पाटील गोरेगावकर, तर उपसभापती अशोक सिरामे | पुढारी

हिंगोली बाजार समिती सभापतिपदी राजेश पाटील गोरेगावकर, तर उपसभापती अशोक सिरामे

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : येथील बाजार समिती सभापती व उपसभापती पदासाठी २३ मे रोजी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत सभापतिपदी राजेश पाटील गोरेगावकर, तर उपसभापतीपदी अशोक सिरामे यांची निवड झाली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात मंगळवारी दुपारी १२ वाजेदरम्यान सभापती, उपसभापती निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी सभापती पदासाठी राजेश पाटील गोरेगावकर, डाॅ. रमेश शिंदे व श्यामराव जगताप हे तिघेजण इच्छुक होते. यातील डाॅ. रमेश शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सभापती पदाच्या शर्यतीत राजेश पाटील गोरेगावकर व श्यामराव जगताप दोघे राहिले. यावेळी गुप्त मतदान घेण्याची मागणी अध्याशी अधिकारी नवनाथ वगवाड यांच्याकडे काही संचालक मंडळींकडून करण्यात येत होती. यावरून सुमारे दहा ते पंधरा मिनिटे चर्चेचे गुऱ्हाळ चालल्यानंतर अखेर हात उंचावून मतदान घेण्याचे ठरले. यात राजेश पाटील गोरेगावकर यांना १२, तर श्यामराव जगताप यांच्या बाजूने सहा जणांनी हात उंचावून मतदान केले. यात राजेश पाटील गोरेगावकर यांची सभापतिपदी निवड झाल्याचे अध्याशी अधिकारी वगवाड यांनी जाहीर केले. उपसभापती पदाच्या शर्यतीत अशोक सिराम व उत्तमराव वाबळे होते. यावेळी वाबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने सिरामे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.”निवड प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे, माजी आ. गजानन घुगे, ॲड. के. के. शिंदे, संदेश देशमुख, परमेश्वर मांडगे, ॲड. अमोल जाधव, भानुदास जाधव यांच्यासह संचालक मंडळी उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button