कोल्हापूर : हालोंडी परिसरात झालेल्या वादळी पावसाने लग्नमंडप कोसळला | पुढारी

कोल्हापूर : हालोंडी परिसरात झालेल्या वादळी पावसाने लग्नमंडप कोसळला

शिरोली (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर सांगली मार्गावरील हालोंडी परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यामध्ये येथील विजय लॉन मधील मंडप कोसळून त्याखाली सापडुन अनेकजण जखमी झाले. जखमींवर कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. अद्यापही शिरोली पोलिसात घटनेची नोंद झालेली नाही.

हातकणंगले तालुक्यातील हालोंडी गावच्या हद्दीमध्ये गांधीनगर मधील व्यापारी आहुजा यांचे विजय लॉन आहे. हे लॉन अनेकदा कार्यासाठी भाड्याने देण्यात येते. सोमवारी लग्नाच्या रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू होता. रात्री अकराच्या दरम्यान अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक वादळाला सुरुवात झाल्याने कार्यक्रमासाठी घातलेला मंडप, तसेच मंडपावरील पत्रे अन्य साहित्य उडून गेले. तर मोठा मंडप कोसळला. यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. यामध्ये काही नागरिक जखमी झाले. मध्यरात्री चार ते पाच ॲम्बुलन्स मधून जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळावर माध्यम प्रतिनिधींना मज्जाव

घटनेची बातमीसाठी माहिती घेण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधींना घटनास्थळावर येण्यास मज्जाव करण्यात आला. घटनास्थळाची माहितीही घेऊ दिली  नाही. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पत्रकारांना अडवणूक करण्यात आली. या लाँनमध्ये नेहमी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यावेळी महामार्गाच्या दुतर्फा पार्क वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असतो. शिवाय तर मध्यरात्री नव्हे तर पहाटे पर्यत डॉल्बीचा कर्णकर्कश दणदणाट सुरु असतो. त्यामुळे हाय वे वरील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास होत असतो. या लॉन धारकांना सर्वा प्रकारे समज द्यावी अशी मागणी हालोंडी परिसरातून होत आहे.

अधिक वाचा :

Back to top button