SRH vs RCB : हैदराबादचे बेंगलोरला १८७ धावांचे आव्हान | पुढारी

SRH vs RCB : हैदराबादचे बेंगलोरला १८७ धावांचे आव्हान

हैदराबाद; वृत्तसंस्था : यष्टिरक्षक हेन्रिच क्लासेनच्या क्लासिकल शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले. क्लासेनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 203.92 च्या स्ट्राईक रेटने 51 चेंडूंत 104 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याला हॅरी ब्रुकने 15 चेंडूंत 27 धावा करत चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पहिल्या दोन षटकांत हैदराबादच्या सलामीवीरांना चांगलेच बांधून ठवले. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीने धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेसवेलने पाचव्या षटकात आधी अभिषेक शर्माला 11 धावांवर त्यानंतर राहुल त्रिपाठीला 15 धावांवर बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले. (SRH vs RCB)

या दोन धक्क्यानंतर हेन्रिच क्लासेन आणि कर्णधार एडिन मार्करमने हैदराबादचा डाव सावरला. मार्करम सावध फलंदाजी करत भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत होता. तर त्याला क्लासेनने आक्रमक फटकेबाजी करत चांगली साथ दिली. यामुळे हैदराबादने 10 षटकांत 81 धावांपर्यंत मजल मारली. यात क्लासेनच्या 40 धावांचा वाटा होता.

मात्र कर्णधार एडिन मार्करमने क्लासेनची साथ लगेचच सोडली. तो 18 धावा करून बाद झाला. मात्र, तोपर्यंत क्लासेनने आपला दांडपट्टा सुरू करून डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. मार्करम बाद झाला त्यावेळी हैदराबादच्या 104 धावा झाल्या होत्या. त्यानंतर क्लासेनने हॅरी ब्रुकच्या साथीने संघाला 178 धावांपर्यंत पोहोचवले. त्याने ब्रुकसोबत 74 धावांची तडाखेबाज भागीदारी रचली. यात त्याचा 47 धावांचा वाटा होता.

क्लासेनने चौथ्या क्रमांकावर येत शतकी खेळी केली. या शतकी खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. मात्र, संघाच्या 178 धावा झाल्या असताना तो 104 धावांवर बाद झाला. आरसीबीच्या हर्षल पटेलने त्याला 19 व्या षटकात बाद केले. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि ब्रुकने हैदराबादला 186 धावांपर्यंत पोहोचवले.

 

हेही वाचा;

Back to top button