पुणे: बारामतीत ४८ लाखांचा पानमसाला, गुटखा जप्त

बारामती, पुढारी वृत्तसेवा: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बारामती एमआयडीसीमध्ये तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत बुधवारी (दि. १७) तब्बल ४८ लाख रुपये किमतीचा पानमसाला, गुटखा जप्त केला. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद सोनवणे (रा. सांगोला, जि. सोलापूर), दादा उर्फ नारायण रमेश पिसाळ व प्रशांत गांधी (दोघे रा. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस हवालदार अभिजित दत्तात्रय एकशिंगे यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
बारामती एमआयडीसीतील ई-९५ गेटसमोर चौधरवस्ती रस्त्याला एक टेम्पो (एमएच १० सीआर ५७९४) उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकला. तो टेम्पो दादा पिसाळ याचा असल्याचे निष्पन्न झाले. टेम्पोची तपासणी केली असता त्यात ३८ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ३२० गोण्या पानमसाला व सुगंधी तंबाखूच्या ९ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १६० गोण्या मिळून आल्या. टेम्पोसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा मुद्देमाल शरद सोनवणे याच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणला होता. तो पुढे विक्रीसाठी प्रशांत गांधी याच्या गोडावूनकडे घेऊन जात असल्याची कबुली दादा पिसाळ याने दिली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, अन्न सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी एस. जी. कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत, तात्या लोखंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.