जुने वाडा गाव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी; धरणातील पाणीसाठा घटला | पुढारी

जुने वाडा गाव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी; धरणातील पाणीसाठा घटला

वाडा : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे जुने वाडा गाव अनेकांच्या आठवणींना आजही तितकाच उजाळा देते. चासकमान धरणाच्या पाण्यात लुप्त झालेले जुने वाडा गाव धरणाची पाणीपातळी घटल्याने दृष्टिक्षेपात आले असून, अनेकांच्या आठवणी उजळल्या आहेत. वाडा व परिसरातील तसेच गावातील विस्थापित झालेले नागरिक आजही आपल्या आठवणी साठवण्याकरिता जुन्या वाडा गावाला मोठ्या प्रमाणात भेटी देत आपल्या पिढीला आठवणी सांगत आहेत. चासकामन धरणाच्या बांधकामास 1978 साली सुरुवात झाली. त्यानंतर जुने वाडा गाव विस्थापित होण्यास सुरुवात झाली. अनेक जण बाहेरगावी गेले, तर काही जवळच नवीन वाडा गावात प्रस्थापित झाले. तेथे स्थायिक झाले.

चासकमान धरणात 1994 साली पाणी अडविण्यास सुरुवात झाल्यानंतर जुने वाडा गाव पाण्यात लुप्त झाले. जुने वाडा गाव हे पश्चिम भागातील सर्वांत मोठे म्हणजेच पश्चिम भागाची आर्थकि राजधानी होती. राजगुरुनगरपासून 28 किमी अंतरावरील वाडा हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव होते. पश्चिम भागातील 51 गावे व अनेक वाड्या-वस्त्यांसाठी गावात मोठी बाजारपेठ होती. अनेक किरकोळ तसेच मोठे व्यापारी होते. अनेक दूध संस्था होत्या. गावातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले. सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने 30 वर्षांनंतरच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गावातील भव्य पुरातन दगडी बांधकामातील श्रीशिव महादेवाचे मंदिर आजही सुस्थितीत आहे.

बाजारपेठेचे अवशेष तसेच धर्मराज मंदिर, श्रीमारुती मंदिर, श्रीविठ्ठल-रखुमाई मंदिर, श्रीशनी मंदिर, श्रीराम मंदिर, श्रीलक्ष्मी-नारायण मंदिर, श्रीगणपती मंदिर, श्रीदत्त मंदिर आदी मंदिरे पाण्याबाहेर आली आहेत. मात्र, पश्चिम भागातील गावांना जोडला जाणारा पूल मात्र दिसत नाही. या धरणाच्या पाण्यात वाडा, कोयाळी, कहू, बिबी, तिफनवाडी, माझगाव या गावांचा बळी गेला. अनेकांच्या संसाराची बसलेली घडी क्षणात विस्कटली. वडिलोपार्जित जमीन या धरणाच्या पाण्यात गेली. या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, वसतिगृह, हॉटेल, राईस मिल अशा अनेक सोयीसुविधायुक्त जुन्या वाडा गावच्या आठवणी अजूनही अनेकांच्या डोळ्यात पाहायला मिळत आहेत. आजही नागरिक मोठ्या संख्येने येथे येत असून, जुन्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळतात.

हेही वाचा

Back to top button