पाण्यासाठी डाळजला पुणे-सोलापूर महामार्ग रोखला | पुढारी

पाण्यासाठी डाळजला पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

कळस : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्याला पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्याचे आवर्तन मिळावे, या मागणीसाठी खडकवासला कालवा संघर्ष समिती कळसच्या वतीने शुक्रवारी (दि. 31) सकाळी 11 वाजता डाळज क्रमांक 2 येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकारी अभियंत्यांच्या पाणी सोडण्याबाबतच्या आश्वासनाशिवाय रस्त्यावरून उठणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यानंतर कार्यकारी अभियंत्या श्वेता कुर्‍हाडे आंदोलनस्थळी दाखल झाल्या. मात्र, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले. हे आंदोलन सुमारे 2 तास सुरूच होते.

खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील कळस, रुई, न्हावी, निरगुडे, भादलवाडी, अकोले आदी गावांतील लाभधारक शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्गावर रखरखत्या उन्हात चटके सहन करत ‘पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’च्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या वेळी संषर्घ समितीच्या सदस्यांची भाषणे झाली. यामध्ये खडकवासला कालव्याच्या पाण्याबाबत इंदापूर तालुक्यावर वारंवार अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली. प्रकल्प सिंचन आराखड्यात मंजूर क्षेत्रापैकी प्रत्यक्ष सिंचित होणारे क्षेत्राचे प्रमाण 8 टक्क्यांवर आले असून, दिवसेंदिवस कालव्याचे पाणी कमी होत चालले आहे. कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना रस्त्यावर येण्याची वेळ आल्याची बाबही खेदजनक असल्याची प्रतिक्रिया उपस्थित आंदोलनकर्त्यांनी या वेळी व्यक्त केली.

दरम्यान, प्रभारी उपविभागीय अभियंता श्यामराव भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना पाणी सोडण्याचे आश्वासन देणार आहात का, असा सवाल केला. यावर त्यांनी तो विषय माझ्या अधिकारात नसल्याचे सांगितले. यावर कार्यकारी अभियंता आल्याशिवाय रस्त्यावरून न उठण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. यानंतर आलेल्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे यांनी आंदोलनकत्र्यांना शांत राहण्याचे आवाहन करत इंदापूरला पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाची सकारात्मक भूमिका आहे असे सांगितले. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, त्यास पाच-सहा दिवसांत मंजूरी मिळेल. याशिवाय पाणी सोडता येणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. यावर ‘आम्ही पिण्यासाठी पाणी मागत आहोत. त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय आत्ताच जाहीर करा. नुसते प्रयत्न नकोत पाणी द्या,’ अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

या आंदोलनात प्रतापराव पाटील, खडकवासला कालवा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विजय गावडे, रमेश खारतोडे, बाळासाहेब भांडवलकर, भगवान खारतोडे, माउली कन्हेरकर, दत्तात्रय दराडे, विनोद पोंदकुले, दादासाहेब खारतोडे, अनिल खारतोडे, विशाल राजेभोसले, राहुल खारतोडे, पिंटू खारतोडे, जनार्दन पांढरमिसे, निवृत्ती गायकवाड आदी उपस्थित होते. भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी बंदोबस्त ठेवला होता, तर महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरिक्षक महेश कुरेवाड यांनी सहकार्‍यांसह वाहतुकीचे नियोजन केले.

हेही वाचा

Back to top button