…तर आम्हीही भारतात येणार नाही ; पीसीबीचा इशारा | पुढारी

...तर आम्हीही भारतात येणार नाही ; पीसीबीचा इशारा

कराची, वृत्तसंस्था : सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून भारतीय संघ ज्या प्रकारे पाकिस्तानात येण्यास नकार देत आहे, त्याच प्रकारे पाकिस्तानही भारतात जाण्यास नकार देईल, असा इशारा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेट संघासाठी आशिया कप हा चर्चेचा विषय ठरला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषक 2023 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही हे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर पाकिस्तानकडून असेही बोलले जात आहे की, असे झाल्यास पाकिस्तानचा संघ भारतात होणार्‍या वन डे वर्ल्डकपमध्येही खेळायला येणार नाही.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला यासंदर्भात बैठकही झाली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता आयसीसीची पुढील बैठक 18 ते 20 मार्च दरम्यान दुबईत होणार आहे. अशा परिस्थितीत मी या बैठकीत हा मुद्दा नक्कीच मांडणार असल्याचे सेठी यांनी सांगितले. एवढेच नाही तर 2025 मध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही सेठीने भारताला धमकी दिली. ते म्हणाले की हे केवळ आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाबद्दल नाही तर 2025 मध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल देखील आहे.

Back to top button