Steve Smith : भारतात कॅप्टन्सी करणे म्हणजे ‘बुद्धिबळ’ खेळासारखे! : स्टीव्ह स्मिथ | पुढारी

Steve Smith : भारतात कॅप्टन्सी करणे म्हणजे ‘बुद्धिबळ’ खेळासारखे! : स्टीव्ह स्मिथ

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात खेळताना संघाचे कर्णधार भूषवणे मला आवडते. कारण येथील खेळपट्ट्यांवर प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी घडण्याची क्षमता असते ज्यामुळे परिस्थिती बुद्धिबळाच्या खेळासारखी बनते,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले आहे. कांगारू संघाचा नियमित कर्णधार कमिन्स आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी मायदेशी परतला आहे. त्यामुळे स्मिथकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. इंदूर कसोटीत भारतावर विजय मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला स्पर्धेत टिकण्यासाठी इंदूर कसोटी जिंकणे आवश्यक होते आणि त्यांनी ते केले. फरक असा होता की पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व नियमित कर्णधार पॅट कमिन्सकडे होते, जो तिसऱ्या कसोटीपूर्वी आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी मायदेशी परतला. अशा परिस्थितीत स्मिथने कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि 2017 च्या पुणे कसोटीप्रमाणे येथेही संघाला विजय मिळवून दिला.

चांगली तयारी करून इंदूरला पोहोचलो

इंदूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताकडून देण्यात आलेले 76 धावांचे लक्ष्य केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. या विजयानंतर स्मिथने कर्णधारपद आणि या कसोटीतील आव्हानांबद्दल आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, ‘आम्ही दिल्ली कसोटी खराब सत्रामुळे गमावली. त्यातून आम्हाला सावरायचे होते. त्यामुळे आमच्या संघाने चांगल्या तयारीने इंदूरमध्ये उतरायचे ठरवले. इंदूर सारख्या मैदानावर विजय मिळवणे खूप कठीण आहे. पण आमची रणनीती येथे यशस्वी झाली. संघ सहका-यांचा मला गर्व आहे.’

होळकर मैदानाच्या खेळपट्टीवर टीका झाली, पण स्मिथला त्याची पर्वा नाही आणि त्याने अशा आव्हानाचा आनंद घेतला. तो म्हणाला, “आतापर्यंत सर्व खेळपट्ट्या फिरकीपटूंना उपयुक्त ठरल्या आहेत. आम्ही आतापर्यंत तीन दिवसांपेक्षा जास्त क्रिकेट खेळू शकलो नाही. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून सर्व कसोटींमध्ये फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. अशा खेळपट्ट्यांवर नेहमीच काही ना काही घडत असते. फलंदाजांना धावांसाठी खूप मेहनत करावी लागते. मला अशा खेळपट्ट्यांवर खेळायला आवडते. सपाट खेळपट्ट्यांवर पाच दिवस खेळायला कंटाळा येतो.’

Back to top button