WTC Final : इंदूर कसोटी हरल्यानंतरही भारताला WTC फायनल खेळण्याची संधी, जाणून घ्या समीकरण | पुढारी

WTC Final : इंदूर कसोटी हरल्यानंतरही भारताला WTC फायनल खेळण्याची संधी, जाणून घ्या समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final : इंदूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी रोहित सेनेचा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग फारसा अवघड झालेला नाही. आता भारत आणि श्रीलंका हे दोनच संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत उरले असून यात भारताचे पारडे जड आहे.

WTC Final चे काय आहे समीकरण

भारताला डब्ल्यूटीसीमधील शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील हा शेवटचा कसोटी सामना असेल. तर श्रीलंकेला 9 मार्चपासून न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. जर भारताने अहमदाबाद कसोटी सामना जिंकला तर तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. जर ही कसोटी अनिर्णित राहिली तरी भारत डब्ल्यूटीच्या अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरेल.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका मालिकेवर ठेवावी लागणार नजर

इंदूर कसोटी गमावल्यानंतर डब्ल्यूटी पॉइंट टेबलमध्ये भारताच्या विजयाची टक्केवारी 60.29 झाली आहे. तर श्रीलंकेच्या विजयाची टक्केवारी 53.33 आहे. जर श्रीलंकेने न्यूझीलंड दौ-यातील दोन्ही कसोटी सामने जिंकल्यास त्यांची विजयाची टक्केवारी 61.11 पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे भारताला आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यासह न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका या मालिकेवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. (WTC Final)

..तर अहमदाबाद कसोटीत विजय मिळवावाच लागेल

मात्र, टीम इंडियाला श्रीलंकेवर अवलंबून न राहता डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर अहमदाबाद कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल. कारण श्रीलंकेने किवींना दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्वीप दिला तर भारताला डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले जाऊ शकते. तसे पाहता लंकन संघाकडून न्यूझीलंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर व्हाईटवॉश होईल हे खूप कठीण आहे. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इंदूरमध्ये पराभव होऊनही शक्यता भारताच्या बाजूने आहे, पण अहमदाबादमधील पराभव भारताच्या आशा धुळीस मिळवण्यासाठी पुरेसा आहे.

श्रीलंकेने एक कसोटी गमावणे आवश्यक

जर भारताने अहमदाबाद कसोटी देखील गमावली तर संघाच्या विजयाची टक्केवारी 56.9 वर घसरेल. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या किमान एका कसोटी सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागेल, अशी आशा भारताला करावी लागेल. श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध एक जरी कसोटी गमावली तर भारत अंतिम फेरीत निश्चित पोहोचेल.

Back to top button