Team India’s Defeat Reasons : इंदूर कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाची 9 मोठी कारणे | पुढारी

Team India’s Defeat Reasons : इंदूर कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाची 9 मोठी कारणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India’s Defeat Reasons : भारतीय संघाला गेल्या 10 वर्षात घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये तिसरा पराभव स्वीकारावा लागला. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान टीम इंडियावर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. भारताच्या पराभवाची काही महत्त्वाची कारणे आहेत. ती जाणून घेणे आवश्यक ठरेल.

अधिक वळणदार खेळपट्टी :

इंदूरच्या खेळपट्टीवर नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्यांच्या खेळपट्ट्यांपेक्षा अधिक वळण घेणारे ट्रॅक होते. या सामन्याच्या पहिल्या दिवशी 14 तर दुसऱ्या दिवशी 16 विकेट पडल्या. गेल्या काही वर्षांपासून असे ट्रॅक भारतात पाहायला मिळत आहेत. यावेळी भारतीय संघच आपल्या खेळपट्टीच्या रणनीतीत अडकला आणि सामना गमवावा लागला. भारतीय फलंदाज पहिल्या डावात कसेबसे 100 धावांचा टप्पा पार करू शकले, तर दुसऱ्या डावात त्यांना 163 धावांपर्यंत मजल मारता आली. यजमान संघाचेच फलंदाज अशा खेळपट्टीवर धावा करू शकत नसतील तर अशा खेळपट्टीची काय गरज आहे? असा प्रश्नही चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Team India’s Defeat Reasons)

खराब फलंदाजी :

खराब फलंदाजी हे टीम इंडियाच्या या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले. संघ कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून एकूण 100 षटकेही खेळू शकला नाही. पहिल्या डावात संपूर्ण संघ 33.2 षटकांत 109 धावांत गारद झाला. तर दुसऱ्या डावातही 60.3 षटकांत 163 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाची सलामीची भागीदारीही अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्माने केएल राहुलऐवजी शुभमन गिलचा संघात समावेश केला, पण गिलची बॅटही दोन्ही डावात शांत राहिली. मधल्या फळीतील एकाही फलंदाजाने आश्वासक फलंदाजी केली नाही. संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली दोन्ही डावात फ्लॉप झाला. हे टीम इंडियासाठी मोठे नुकसान ठरले. पुजाराने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले असले तरी ते संघाला तारू शकले नाही. (Team India’s Defeat Reasons)

कर्णधार रोहित शर्माचे चुकीचे निर्णय

सलग दोन विजय नोंदवल्यानंतर पहिल्यांदाच कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयांवर प्रश्न निर्माण झाले आहे. स्वतःच्या फलंदाजीबाबत असो, गोलंदाजी करवून घेण्याबाबत असो किंवा डीआरएस घेण्याबाबत असो, रोहितने सर्वत्र संघाची निराशा केली आहे. पहिल्या डावात तो खराब शॉटवर आऊट झाला, तर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अश्विनला उशिराने गोलंदाजी दिली. रोहितच्या चुकीच्या निर्णयामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात तीन डीआरएस खराब केले. यानंतर जडेजाला अय्यरच्या आधी फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. फॉर्ममध्ये असलेला अक्षर पटेल 9व्या क्रमांकावर आला आणि शेवटच्या सामन्यात नाबाद परतला. कुठेतरी हे सर्व निर्णय संघासाठी चुकीचे ठरले, अशी भावना चाहते व्यक्त करत आहेत. (Team India’s Defeat Reasons)

अश्विनला आक्रमणात आणण्यास विलंब

सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. कॅमेरून ग्रीन आणि पीटर हँड्सकॉम्ब खेळत होते. दुसऱ्या दिवशी जडेजा आणि अक्षर पटेल यांकडून रोहितने बरीच षटके टाकून घेतली. पण अश्विन सारख्या गोलंदाजाच्या हातात चेंडू उशिरा देण्यात आला. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 170 च्या पुढे गेली होती. अश्विन आला आणि उमेश यादवच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या सहा विकेट 11 धावांत घेतल्या. रोहितने गोलंदाजीत हा बदल आधी केला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

फलंदाजीत आक्रमण करण्यासाठी संदेश पाठवा

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अक्षर पटेल फलंदाजी करत होते. त्यावेळी दोघांनी विकेटवर टिकून राहणे आवश्यक होते, कारण ही शेवटची फलंदाजी जोडी होती. यानंतर केवळ मोहम्मद सिराज आणि उमेश यादव फलंदाजीसाठी उरले होते. असे असूनही रोहितने ड्रेसिंग रुममधून आक्रमक फलंदाजी खेळण्याचा संदेश पाठवला, तो टीम इंडियावर उलटला.

फील्ड प्लेसमेंटमध्ये त्रुटी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट करत असे, ते रोहितच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळाले नाही. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 76 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियानेही दिवसाच्या दुस-याच चेंडूवर उस्मान ख्वाजाची विकेट गमावली होती. यावेळी त्यांची धावसंख्या शून्य होती. पण यानंतर कर्णधार रोहित फील्ड प्लेसमेंटची रणनीती आखण्यात अयशस्वी ठरला. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी मैदानावर स्थिरावण्यासाठी पूर्ण वेळ घेतला आणि नंतर लंच ब्रेकपूर्वी थोडीफार फटेबाजी करून सामना संपवला.

टीम इंडियाची फिरकीपुढे गिरकी :

भारताने दोन्ही डावात 20 विकेट गमावल्या, त्यात एक धावबादही होता. उर्वरित 19 विकेटपैकी 18 विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. मिचेल स्टार्कला फक्त एक विकेट मिळाली. अशा स्थितीत भारतीय फलंदाज फिरकीपटूंना खेळवण्यास सक्षम नसल्याचे सिद्ध झाले.

अक्षर पटेलची निष्प्रभ गोलंदाजी :

आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने मालिकेतील तीन सामन्यांत मिळून 39 बळी घेतले आहेत. जडेजाच्या खात्यात 21 तर अश्विनच्या खात्यात 18 विकेट्स जमा झाल्या आहेत. मात्र तिसरा फिरकीपटू अक्षर पटेलने गोलंदाज म्हणून तो निष्प्रभ ठरला. फलंदाज म्हणून त्याने पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके फटकावली आणि संघाला अडचणीतून बाहेर काढले होते. इंदूर कसोटीच्या दोन्ही डावात तो अनुक्रमे 12 आणि 15 धावा करून नाबाद राहिला. इतर खेळाडूंची साथ मिळाली असती तर त्याने नक्कीच चांगली फटकेबाजी केली असती. पण तसे झाले नाही. दुसरीकडे अश्विन आणि जडेजाला विकेट मिळत नसताना अक्षरने गोलंदाजीत फारसे योगदान दिले नाही.

केएस भरतने केले निराश

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अपघातामुळे संघाबाहेर आहे. त्यांच्या जागी केएस भरतला संधी मिळत आहे. मात्र त्याच्या फलंदाजीने सातत्याने निराशा केले आहे. त्यामुळे पंतची उणीव टीम इंडियाला खूप जाणवली. संपूर्ण मालिकेतील पाच डावांमध्ये भरतने आतापर्यंत केवळ 57 धावा केल्या आहेत.

Back to top button