WPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या जर्सीचे अनावरण | पुढारी

WPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या जर्सीचे अनावरण

मुंबई, वृत्तसंस्था : 4 मार्च रोजी महिला प्रीमियर लीग स्पर्धेला (WPL 2023) प्रारंभ होणार आहे. यासाठी सर्व फ्रँचाईजी जोरात कामाला लागल्या असून, मुंबई इंडियन्सने या स्पर्धेसाठी आपल्या जर्सीचे अनावरण केले. या जर्सीमध्ये तीन रंगांचा समावेश असून, सूर्याचा नारंगी, समुद्राचा निळा आणि मुंबईचा सोनेरी, असा या रंगांचा अर्थ आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमधून सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर माघारी परतला. आता यानंतर ऐतिहासिक अशा पहिल्या महिला प्रीमियर लीगचे वेध सगळ्यांना लागले आहेत. यात मुंबई इंडियन्सने सर्वात आधी बाजी मारली आहे.

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंटस् यांच्यातील महामुकाबल्याने 4 मार्च रोजी महिला प्रीमियर लीगचा नारळ फुटणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स ही पहिली फ्रँचायजी ठरली जिने ‘डब्ल्यूपीएल’साठी पहिल्यांदा आपल्या जर्सीचे अनावरण केले. मुंबई इंडियन्सचा संघ सरावासाठी एकत्र येणारा पहिला संघ ठरला आहे. हरमनप्रीत कौर संघात लवकरच सहभागी होत आहे. (WPL 2023)

मुंबई इंडियन्सने जर्सी अनावरणाचा व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, ‘सुपरहिरोज् जे परिधान करतात ते… आमची पहिलीवहिली ‘डब्ल्यूपीएल’ जर्सी आम्हाला खूप आवडली.’ मुंबई इंडियन्सने ‘डब्ल्यूपीएल’मध्येही आपला निळा रंग सोडलेला नाही. याचबरोबर जर्सीमध्ये गोल्डन रंगदेखील वापरण्यात आला आहे. त्यासोबत नवा नारंगी रंगदेखील यात वापरण्यात आला आहे. त्यामुळे ही जर्सी पुरुषांच्या जर्सीपेक्षा वेगळी दिसते.

मुंबई इंडियन्सची ‘डब्ल्यूपीएल’ जर्सी मनीषा जयसिंग यांनी डिझाईन केली आहे. मुंबई हे सुमद्रकिनार्‍यावरील शहर आहे. इथे जबरदस्त सनसेट द़ृश्य असतात. याच सूर्याकडून ऊर्जा मिळते. त्याचाच नारंगी रंगदेखील जर्सीमध्ये वापरण्यात आला आहे.

Back to top button