अबब.. रोनाल्डोची वार्षिक कमाई 1800 कोटी | पुढारी

अबब.. रोनाल्डोची वार्षिक कमाई 1800 कोटी

रियाध : जगभरातील क्रीडारसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या कमाईमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्याची वार्षिक कमाई आहे तब्बल 1800 कोटी रुपये.

रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला असून तो आता सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब अल नासरमध्ये सामील झाला आहे. रोनाल्डो अल नासर यांच्यातील कराराकडे क्रीडा जगतातील सर्वात महागडा करार म्हणून पाहिले जात आहे. सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबच्या वतीने खेळण्यासाठी रोनाल्डोला दरवर्षी तब्बल 1800 कोटी रुपये मिळतील. विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूला इतके पैसे कमवण्यासाठी जवळपास 150 वर्षे क्रिकेट खेळावे लागणार आहे.

रोहित शर्मा टॉपवर

रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहेत. यात कमाईच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे तो रोहित शर्मा. त्याने आयपीएलचे 15 हंगाम खेळून 178 कोटी रुपये कमावले आहेत. त्याची सरासरी काढली तर रोहित आयपीएल खेळून दरवर्षी सुमारे 12 कोटी रुपये कमावतो. त्यामुळे 1800 कोटी रुपये कमवण्यासाठी त्याला दीडशे वर्षे आयपीएल खेळावे लागणार आहे.
धोनीने आयपीएलचे 15 हंगाम खेळून 176 कोटी रुपये कमावले आहेत. कोहलीने तेवढेच हंगाम खेळून 173 कोटींची कमाई केली आहे. तसेच जडेजाने आयपीएलमधून 109 कोटींची कमाई केली आहे. आयपीएलद्वारे 100 कोटींहून अधिक कमाई करणारे केवळ सात खेळाडू आहेत.

Back to top button