मोरोक्को : ‘स्थलांतरित’ खेळाडूंच्या एकत्रित मिश्रणाची यशोगाथा! | पुढारी

मोरोक्को : ‘स्थलांतरित’ खेळाडूंच्या एकत्रित मिश्रणाची यशोगाथा!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कतार या आखाती देशात होत असलेली ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा प्रचंड गाजली. एका छोट्या देशाने या मोठ्या स्पर्धेचे आयोजन स्वबळावर करण्याचे आव्हान लिलया पेलले. मैदानातही या स्पर्धेने अनेक अनपेक्षित निकाल दिले. त्यापैकीच एक म्हणजे मोरोक्को संघाने केलेली कामगिरी. विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंत अनपेक्षित धडक मारलेल्या मोरोक्कोच्या संघात 26 पैकी 14 खेळाडू हे देशाबाहेर जन्मले आहेत.

स्थलांतरित खेळाडूंचे एकत्रित मिश्रण असणार्‍या या संघाने अवघ्या फुटबॉल जगताला आश्चर्यचकित केले असून, उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला आफ्रिकन देश ठरला. मोरोक्को संघातील प्लेमेकर हकीम झियेच, बचावपटू नौसैर मजरौई आणि मिडफिल्डर सोफयान अमराबत हे प्रमुख खेळाडू नेदरलँडमध्ये जन्मलेले आहेत. अचराफ हकिमीचा जन्म स्पेनमध्ये झाला. तो वयाच्या सहाव्या वर्षी रिअल माद्रिदच्या युवा संघात सामील झाला; तर गोलकिपर यासीन बोनो कॅनेडियन वंशाचा आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक वालिद रेग्रागुई, कॅप्टन रोमेन सायस आणि सोफियान बौफल हे जन्माने फ्रेंच आहेत.

मोरोक्कोच्या अनेक खेळाडूंनी युरोपियन लीगमध्ये आपली छाप पाडली आणि जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. रॉयल मोरोक्कन फुटबॉल फेडरेशनने देशापासून भौगोलिक अंतराने दूर गेलेल्या तरुण खेळाडूंना एकत्र येण्यासाठी साद घातली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला आणि प्रशिक्षक वालिद रेग्रागुई यांच्या मार्गदर्शनाखाली एका भक्कम संघाची निर्मिती करण्यात यश आले. ज्याची 2022 च्या कतार विश्वचषक स्पर्धेत सार्‍या जगाला ‘याची देही, याची डोळा’ अनुभूती मिळाली.

यासीन बोनो नावाची अभेद्य भिंत

मोरोक्को संघाचा विश्वचषकातील प्रवास पाहता त्यांनी उपांत्य सामन्यापूर्वीच्या पाच सामन्यांमध्ये केवळ एक गोल खाल्ला आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात कॅनडाविरुद्ध त्यांच्या बचावफळीतील खेळाडूकडूनच स्वयंगोल झाला होता. प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत मोरोक्कोचे गोल जाळे भेदता आलेले नाही. यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती कॅनडात जन्मलेला गोलकिपर यासीन बोनो याने; तर माद्रिदमध्ये जन्मलेला अचराफ हकिमी उजव्या बाजूने चपळाईने आक्रमण करण्यात तरबेज आहे. त्याला जन्माने डच (नेदरलँड) असणार्‍या सोफियान अमराबत या शक्तिशाली मिडफिल्डरची कौशल्यपूर्ण साथ मिळते. त्याचवेळी फ्रेंच वंशाचा सोफियान बौफल डावीकडून विरोधी संघाच्या बचाव फळीला खिंडार पाडण्यात पटाईत आहे.

तब्बल 50 लाख मोरोक्कन स्थलांतरित

मोरोक्कन हे युरोपमधील सर्वात मोठ्या स्थलांतरितांपैकी एक असून, ही लोकसंख्या अंदाजे 50 लाखांच्या आसपास आहे. इतक्या मोठ्या संख्येने स्थलांतरित असले, तरी मोरोक्कन नागरिकांची त्यांच्या मायदेशाशी नाळ तुटलेली नाही. कौन्सिल ऑफ द मोरोक्कन कम्युनिटी अ‍ॅब्रॉड या सरकारी एजन्सीच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, युरोपमधील 18 ते 35 वयोगटातील 61 टक्के मोरोक्कन लोक दरवर्षी आफ्रिकेतील आपल्या मायदेशाला भेट देतात.

मोरोक्कोच्या बाहेर जन्मलेले; पण देशासाठी खेळणारे खेळाडू

यासीन बोनो : जन्म 1991 : मॉन्ट्रियल, कॅनडा
मुनीर मोहम्मीदी : जन्म 1989 : कुएटा, स्पेन
अचराफ हकिमी : जन्म 1998 : माद्रिद, स्पेन
नौसैर मजरौई : जन्म 1997 : लीडरडॉर्प, नेदरलँड
रोमेन सायस : जन्म 1990 : बोर्ग-डी-पीग, फ्रान्स
सोफयान अमराबत : जन्म 1996 : हुझेन, नेदरलँड
इलियास चेअर : जन्म 1997 : अँटपर्व, बेल्जियम
सेलीम अमल्लाह : जन्म 1996 : हॉट्रेज, बेल्जियम
बिलाल एल खाननस : जन्म 2004 : स्ट्रॉम्बीक-बेव्हर, बेल्जियम
हकीम झियेच : जन्म 1993 : ड्रोनटिन, नेदरलँड
अनास जरौरी : जन्म 2000 : मेचेलेन, बेल्जियम
झकेरिया अबौखलाल : जन्म 2000 : रॉटरडॅम, नेदरलँड
सोफियान बौफल : जन्म 1993 : पॅरिस फ्रान्स
वालिद चेदिरा : जन्म 1998 : लोरेटो, इटली

Back to top button