Neymar : ‘मी मानसिकरित्या उद्ध्वस्त’! नेमारची ‘इन्स्टा’वरून कबुली | पुढारी

Neymar : ‘मी मानसिकरित्या उद्ध्वस्त’! नेमारची ‘इन्स्टा’वरून कबुली

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neymar Pyschologically Destroyed : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मोठे उलटफेर झाले. पाच वेळचा चॅम्पियन ब्राझीलला आपला गाशा गुंडाळून स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाने पेनल्टी शुटआउटमध्ये ब्राझीलवर मात करून सेमीफायनल गाठली. ब्राझीलचा पराभव दिग्गज खेळाडू नेमारच्या जिव्हारी लागला आहे. आपण “मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त” झाल्याची कबुली त्याने इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

नेमारने पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशिया विरुद्ध पराभव पत्करणे ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट घटना आहे. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो आहे. सामना संपल्यानंतर अर्धांगवायूचा झटका आल्यासारखी माझी अवस्था झाली होती. मैदानावर बसलो होतो तेव्हा माझे शरीर सुन्न पडले होते. डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. दुर्दैवाने पुढचा बराच काळ पराभवाची जखम भळभळत राहणार आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. (Neymar Pyschologically Destroyed)

क्रोएशियाविरुद्धच्या संघर्षपूर्ण सामन्यात (105+1 मिनिट) नेमारने मोक्याच्या क्षणी गोल करून ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. या गोलसह तो महान पेले यांच्या पंगतीत जाऊन बसला. त्याने ब्राझीलसाठी 77 वा गोल डागला. परंतु क्रोएशियाने 117 व्या मिनिटाला बरोबरी साधून ब्राझीलच्या स्वप्नांना सुरुंग लावला. अतिरिक्त वेळेनंतरही 1-1 अशी बरोबरी राहिल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यात क्रोएशियाने 4-2 अशी मात देत सामना जिंकून ब्राझीलला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. नेमारने मात्र ब्राझीलच्या पराभवानंतर लगेचच आपल्या चाहत्यांना धक्का दिला. त्याने आपण यापुढे पुन्हा राष्ट्रीय जर्सीमध्ये दिसू याची हमी देऊ शकत नाही, असे म्हणत निवृत्तीचे संकेत दिले. (Neymar Pyschologically Destroyed)

 

View this post on Instagram

 

A post shared by NJ 🇧🇷 (@neymarjr)

Back to top button