आंद्रे रसेल याने मारले सहा चेंडूंत सहा षटकार | पुढारी

आंद्रे रसेल याने मारले सहा चेंडूंत सहा षटकार

सेेंट किटस् : वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालताना दिसला आहे. यावेळी द सिक्स्टी स्पर्धेच्या 9 व्या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळताना, रसेलने सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियटस्विरुद्ध 24 चेंडूंत 72 धावांची तुफानी खेळी खेळली. फलंदाजीदरम्यान रसेलने विरोधी गोलंदाजांचा पूर्ण धुव्वा उडवला.

आंद्रे रसेलने सेंट किटस्विरुद्ध 6 चेंडूंत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे; परंतु हे सर्व षटकार रसेलच्या बॅटमधून एकाच षटकात आले नाहीत. रसेलने प्रथम डॉमिनिक ड्रेक्सविरुद्ध शेवटच्या चार चेंडूंवर चार षटकार मारले आणि त्यानंतर पुढच्याच षटकात पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन उत्तुंग षटकार मारून हा पराक्रम पूर्ण केला.

आंद्रे रसेल मैदानात धुमाकूळ घालत होता. त्याने अवघ्या 24 चेंडूंत 72 धावा केल्या. रसेलच्या बॅटमध्ये 5 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 300+ होता. रसेलच्या खेळीच्या जोरावर त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने 10 षटकांत 155 धावा केल्या.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या त्रिनबागो नाईट रायडर्सने सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियटस्समोर 60 चेंडूंत 5 गडी गमावून 156 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट किटस् संघाला निर्धारित षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 152 धावाच करता आल्या. संघासाठी खालच्या क्रमवारीत शेरफेन रुदरफोर्डने अवघ्या 15 चेंडूंत 50 धावांचे स्फोटक अर्धशतक झळकावले, पण तोही संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

Back to top button