CWG 2022 INDW vs AUSW Final : भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव, रौप्य पदकावर समाधान | पुढारी

CWG 2022 INDW vs AUSW Final : भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव, रौप्य पदकावर समाधान

बर्मिंगहॅम; पुढारी ऑनलाईन : २२ व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतील (CWG 2022 INDW vs AUSW Final) क्रिकेट टी २० च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ठेवलेल्या १६२ धावांचा सामना करताना भारतीय महिला संघाने दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. ऑस्ट्रेलिया संघाने भारताला १५२ धावात रोखले. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्स यांनी आव्हानाचा दमदार पाठलाग केला होता. पण अखेरच्या पाच षटकात लागोपाठ विकेट गमावल्याने भारतीय संघ पिछाडीवर पडला. दीप्ती शर्मा आणि स्नेहल राना यांनी अखेरच्या षटकात काही फटकेबाजी केली पण, ती पुरेशी ठरु शकली नाही. अखेर ऑस्ट्रेलिया संघाने भारताला ९ धावांनी नमवले. या पराजयामुळे भारतीय महिला संघ उपविजेता ठरुन रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या १६२ धावांचा पाठलाग करण्यास मैदान उतरलेल्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या सलामी जोडीला चांगली कामगिरी नोंदवता आली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात अनुक्रमे स्मृती मानधना ६ धावांवर आणि शेफाली वर्मा ११ धावांवर बाद झाली. सुरुवातीलाच महत्त्वाचे दोन बळी मिळाल्यामुळे भारत दबावाखाली आला होता. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्स यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी धावगती वाढवत ठेवली. जम बसल्यावर हरमनप्रीतने चांगले षटकार व चौकार लगावले तर जेमिमाने तिला चांगली साथ दिली. या दोघी खेळपट्टीवर असताना भारताला यांच्या कडून आशा होत्या. पण, पंधराव्या षटकात जेमिमा रॉड्रिक्स ( ३३ चेंडूत ३३ धावा) बाद झाली. तेव्हा भारताची धावसंख्या ११८ झाली होती. त्यानंतर पुजा वस्त्रकार मैदानात उतरली पण ती फारसे योगदान देऊ शकली नाही. पुढील १६ व्या षटकात पुजा वस्त्रकार १ धाव करुन झेल देऊन बाद झाली. त्या पुढील चेंडूवर हरमनप्रीत कौर झेल देऊन बाद झाली. झटपट तीन फलंदाज बाद झाल्यामुळे भारत पुन्हा पिछाडीवर पडला. कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधाराची जबाबदारपुर्ण खेळी खेळली. तिने ४३ चेंडूत ६५ धावा केल्या. या खेळीत तिने ७ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली.

एकवेळ भारताचा स्थिती १५ षटकानंतर ११८ धावात २ बाद अशी होती. त्यानंतर १६ व्या षटकात ५ बाद १२१ अशी बिकट अवस्था झाली होती. यानंतर दीप्ती शर्मा आणि स्नेह राना यांनी डावाचे सुत्रे हाती घेतली. पण, चेंडू आणि आवश्यक धावा यांच्यातील अंतर अधीक होते. दीप्तीने काही मोठे फटके मारत हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. दीप्ती ८ चेंडूत १३ धावा करुन पायचीत होत बाद झाली. यानंतर स्नेह राना (८ धावा), राधा यादव (१ धाव) यास्तीका भाटीया (२ धाव), मेघना सिंग (१ धाव) करुन बाद झाल्या. अखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघास १५२ धावात रोखत ९ धावांनी विजय संपादन केला.

राष्ट्रकूल स्पर्धेतील साखळी सामन्यातील पहिल्या सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. याचीच पुनर्रावृत्ती अंतिम सामन्यात पुन्हा एकदा पाहण्यास मिळाली. साखळी सामन्यात भारताची डोकेदुखी ठरलेली अॅशले गार्डनरच पुन्हा भारताच्या विजयात अडसर ठरली. गार्डनरला या सामन्या बॅटने फारचे योगदान देता आले नाही पण तिने तीन प्रमुख फलंदाज बाद करत भारताला पुन्हा एकदा मोठे झटके दिले. तिने शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर आणि पुजा वस्त्रकारला बाद करत भारताचे कंबरडे मोडले. जलदगती गोलंदाज मेगन शट हिने दोन बळी घेतले तर जेस जोनासेन आणि डार्सी ब्राउन यांनी १-१ बळी घेतले.

तत्पुर्वी, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी हिच्या ६१, कर्णधार मेग लॅनिंग हिच्या ३६ धावा आणि ॲशले गार्डनर हिच्या २५ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ८ बाद १६१ धावा बनविण्यात यश मिळवले. (CWG 2022 INDW vs AUSW Final)

भारताकडून गोलंदाज रेणुका सिंग हिच्या २ बळी तसेच स्नेह राणा हिच्या २ आणि राधा यादव व दीप्ती शर्मा यांनी घेतलेल्या १-१ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १६१ धावांत रोखण्यात भारताला यश आले. इंग्लंड विरुद्धच्या सामन्याप्रमाणे भारताच्या महिला संघाने अंतिम सामन्यात देखिल अंत्यत चांगले क्षेत्ररक्षण केले. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी घेतलेला अफलातून झेल आणि राधा यादव याने स्वत:च्या गोलंदाजीवर मेग लॅनिंगला केलेले धाव बाद अशा जबदस्त क्षेत्ररणाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर चांगलेच दडपण निर्माण केले. जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जम बसवून गोलंदाजांची धुलाई करण्याची केली, जेव्हा क्षेत्ररक्षणाच्या बळावर भारताने बळी मिळविण्यात यश मिळवले. (CWG 2022 INDW vs AUSW Final)

Back to top button