स्नेहल बेंडके यांची ‘फिबा’ तांत्रिक समन्वयकपदी निवड | पुढारी

स्नेहल बेंडके यांची ‘फिबा’ तांत्रिक समन्वयकपदी निवड

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  क्रीडानगरी कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके यांची दि इंटरनॅशनल बास्केटबॉल असोसिएशनतर्फे जागतिक महासंघाकडून ‘फिबा’ तांत्रिक समन्वयकपदी (टेक्निकल डेलिगेट) निवड झाली आहे. बैरूत-लेबनान येथे दि. 1 ते 4 जुलैदरम्यान होणार्‍या ‘फिफा वर्ल्डकप क्‍वॉलिफायर गेम’मध्ये त्या सहभागी होणार आहेत. या पदासाठी निवड होणार्‍या त्या पहिल्या आशियाई व भारतीय महिला आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे व्यवस्थापन, मार्गदर्शन, नियम व अटी याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी डेलिगेटवर असते. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्याचे काम पाहण्याची संधी स्नेहल यांना मिळाली आहे. यापूर्वी त्यांनी तेरा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जागतिक स्तरावरील सर्वोच्च नामांकित स्पर्धेत पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्नेहल यांच्या कारकिर्दीची दखल घेऊन डेलिगेटपदासाठी निवड करण्यात आली आहे. या पदाच्या निवड प्रक्रियेतून पाचजणींना मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते. यासाठीच्या टेक्निकल डेलिगेटपदाचे लायसेन्स ‘फिबा’तर्फे त्यांना देण्यात आले आहे. यापूर्वी दुबई येथे 2021 ला झालेल्या आशियाई टेक्निकल डेलिगेट वर्कशॉपसाठी त्यांची निवड झाली होती. यावेळी इंद्रजित घोरपडे, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर, अजिंक्य बेल्हे उपस्थित होते.

Back to top button