थिएम अंतिम फेरीत | पुढारी | पुढारी

थिएम अंतिम फेरीत | पुढारी

मेलबर्न : वृत्तसंस्था 

ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डॉमेनिक थिएमने पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या सातव्या मानांकित अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेवला पराभूतकेले. याबरोरच थिएमने अंतिम फेरीत धडक मारली. थिएमने 3-6, 6-4, 7-6, 7-6 अशा फरकाने ज्वेरेवला नमविले. अंतिम सामन्यात आता थिएमसमोर अनुभवी नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असेल.

सामन्याच्या सुरुवातीपासून डॉमेनिक थिएम व अलेक्झांडर ज्वेरेव यांच्यामध्ये चुरशीचा सामना होण्याची शक्यता होती. ज्वेरेवने आक्रमक सुरुवात करीत पहिला सेट 6-3 असा आपल्या नावे केला. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये थिएमने पुनरागमन करीत सेट 6-4 असा जिंकत बरोबरी साधली. नंतरच्या दोन्ही सेटमध्ये थिएमला ज्वेरेवने चांगली टक्कर दिली; पण थिएमने जोरदार खेळ करीत 7-6, 7-6 अशी बाजी मारत अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. हा सामना तब्बल 3 तास 42 मिनिटे चालला.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुगुरुझा, केनिन यांच्यात झुंज 

ऑस्ट्रेलिया ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बिगर मानांकित गार्बाईन मुगुरुझाचा सामना सोफिया केनिनशी होणार आहे. स्पर्धेत यापूर्वीच सेरेना विल्यम्स ही प्रबळ दावेदार समजली जात होती. त्यामुळे टेनिसप्रेमींकडून अंतिम सामन्याची कल्पना देखील केली गेली नसेल. उलटफेर झालेल्या या स्पर्धेत 21 वर्षीय केनिनने जर स्पेनच्या मुगुरुझाला नमविले तर ती ‘जायंट किलर’ ठरेल. असे झाल्यास सेरेनाला मागे टाकत ती अमेरिकेची अव्वल मानांकित खेळाडू बनेल. अमेरिकेची 38 वर्षीय सेरेना ही ऑस्ट्रेलियाची मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँडस्लॅम विक्रमाची बरोबरी साधण्यापासून केवळ एक किताब दूर आहे. तिला तिसर्‍या फेरीत चीनच्या वांग कियांगने नमविले. गतचॅम्पियन नाओमी ओसाका हीदेखील तिसर्‍या फेरीत 15 वर्षीय कोकोकडून पराभूत झाली. कोकोला अमेरिकेच्या केनिनने नमविले. आघाडीच्या दहा खेळाडूंमधील सहा खेळाडू तिसर्‍या फेरीतच गारद झाले. त्यामुळे अ‍ॅश्ले बार्टीचा मार्ग सोपा झाला. मात्र, 14 व्या मानांकित केनिनने बार्टीला उपांत्य फेरीत पराभूत केले.

म्लादेनोव्हिच-बाबोस जोडीला दुहेरीचे जेतेपद 

फ्रान्सची क्रिस्टिना म्लादेनोव्हिच व हंगेरीची टिमिया बाबोस जोडीने अव्वल मानांकित सियेह सू वेई व बार्बरा स्ट्रायकोव्हा जोडीला नमवित ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीचे जेतेपद मिळवले. दोन्ही खेळाडूंनी विम्बल्डन चॅम्पियन जोडीला 6-2, 6-1 असे नमविले. म्लादेनोव्हिच व बाबोस जोडीचा हा तिसरा आणि एकूण दहावा ग्रँडस्लॅम किताब आहे.

Back to top button