IPL 2024: पंचांशी वाद घालणे संजू सॅमसनला पडले महागात, BCCIने केली ‘ही’ कारवाई | पुढारी

IPL 2024: पंचांशी वाद घालणे संजू सॅमसनला पडले महागात, BCCIने केली 'ही' कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्‍पर्धेतील राजस्‍थान रॉयल्‍स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा दंड ठोठावला आहे. सामन्‍यातील मॅच फीच्या 30 टक्के रक्कम सॅमसनला दंड म्हणून भरावी लागणार आहे. जाणून घेवूया मंगळवारी (दि. ७) दिल्‍ली विरुद्ध झालेल्‍या सामन्‍यात नेमकं काय घडलं….

IPL 2024 : संजू पंचांशी भिडला

आयपीएल स्‍पर्धेत मंगळवारी राजस्‍थानचा सामना दिल्‍लीशी होता. राजस्‍थानने टॉस जिंकला. दिल्‍लीला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. दिल्‍लीने २० षटकांमध्‍ये २२१ धावा केल्‍या. या लक्ष्‍याचा पाठलाग करताना १६ व्‍या षटकात दिल्‍लीचा गोलंदाज मुकेश कुमारच्‍या चेंडूवर संजू सॅमसनने जोरदार फटका मारला. सीमारेषेवर शाय होपने त्‍याचा झेल पकडला. यावेळी होप सीमारेषेला स्‍पर्श करण्‍यापासून स्‍वत:ला वाचवताना दिसला. पंचांनी तत्‍काळ संजूला आऊट दिले. संजू तंबूत परतत असताना व्‍हिडिओ रिप्‍लेमध्‍ये जे दिसले यावरुन संजूने पंचांबरोबर वाद घातला. पंचांशी वाद घातल्‍यामुळे बीसीसीआयने त्‍याला दंड ठोठावला आहे. सामन्‍यातील मॅच फीच्या 30 टक्के रक्कम सॅमसनला दंड म्हणून भरावी लागणार आहे.

IPL 2024 : तंत्रज्ञान चुकीचे असेल तर….

या वादावर ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू म्‍हणाले की, ” संजू सॅमसनचा आऊट होण्याचा निर्णयामागे वेगवेगळी मते असू शकतात; परंतु जेव्हा आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणार्‍या खेळाडूचा पाय दोनदा सीमारेषेवर आदळल्‍याचे दिसले. फलंदाज आउट आहे की नाही हे तपासण्‍यासाठी तुम्ही तंत्रज्ञान वापरत नाही. जर तुम्ही तंत्रज्ञान वापरत असाल आणि हे तंत्रज्ञान चुकीचे असेल तर हे पाहण्यासारखे आहे.”

संबंधित बातम्या

काय म्हणाले बीसीसीआय?

या कारवाईबाबत बीसीसीआयने स्‍पष्‍ट केले आहे की, आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.8 अंतर्गत सॅमसनची कृती ही चुकीची आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगाबाबत सामनाधिकारींचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

राजस्‍थान पराभूत, दिल्‍लीचे आव्‍हान कायम

मंगळवारी झालेल्‍या सामन्‍यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 221 धावा केल्या. अभिषेक पोरेलने सर्वाधिक ६५ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात राजस्थान संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावापर्यंत मजल मारता आली. कर्णधार संजू सॅमसनने 46 चेंडूत 86 धावा केल्या. तर फिरकीपट्र कुलदीप यादवने 18व्या षटकात दोन गडी बाद करत सामना दिल्‍लीकडे झुकवला.

 

 

Back to top button