लंकेविरुद्ध चमक दाखविण्याची संधी : धवन | पुढारी

लंकेविरुद्ध चमक दाखविण्याची संधी : धवन

मुंबई पुढारी वृत्तसेवा : श्रीलंकेविरुद्ध निर्धारित षटकांच्या मालिकेत दुसऱ्या श्रेणीतील खेळाडू आपले कौशल्य दाखवण्यासोबतच मुख्य संघात स्थान मिळवण्याची देखील संधी आहे, असे श्रीलंकेच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन म्हणाला. धवन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत वर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाला की, हा संघ चांगला आहे. आमचा संघ सकारात्मक आहे. तसेच खेळाडू देखील खूप उत्साहीत आहेत. हा दौरा सर्वांसाठी आपले कौशल्य दाखवण्याची संधी आहे. आमचे क्वारंटाईनने 13 ते 14 दिवस झाले आहेत. आणि खेळाडू मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहेत. आमच्याकडे तयारीकरता 10 ते 12 दिवसांचा कालावधी आहे.

नियमित कर्णधार विराट कोहली आणि मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने धवन श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचा उप कर्णधार असणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि इतकेच टी 20 सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात ही 13 जुलैला सुरू होऊन 25 जुलैला संपणार आहे. 

भारतीय क्रिकेट बोर्डाने दौऱ्यासाठी 20 सदस्यीय संघाची निवड केली. ज्यामध्ये हार्दिक पंड्या तसेच स्पिनर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलचा देखील समावेश आहे. युवा फलंदाज देवदत्त पड्डीकल आणि पृथ्वी शॉ याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. संघ संयोजनाबाबत बोलताना धवन म्हणाला की, खेळाडू तयार आहेत आणि ते सामना खेळण्यास उत्सुक आहेत. या खेळाडूंनी आयपीएल आणि अन्य स्पर्धेत यापूर्वीच स्वत:ला सिद्ध केले आहे. यासोबत संघात युवा आणि अनुभव यांचे चांगले मिश्रण आहे.

वाचा : भारत-इंग्लंड महिला संघांत आज पहिला वन-डे सामना

वाचा : धोनीच्या ‘या’ फोटोवरून सोशल मीडियावर गोंधळ

Back to top button