Pune Porsche crash : ना ब्रिथ अ‍ॅनालायझर, ना सॅम्पल टेस्टचा अहवाल: पुणे पोलिस टीकेचे धनी | पुढारी

Pune Porsche crash : ना ब्रिथ अ‍ॅनालायझर, ना सॅम्पल टेस्टचा अहवाल: पुणे पोलिस टीकेचे धनी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मद्य प्राशन करून पोर्शे ही आलिशान कार चालवून अल्पवयीन मुलाने तरुण-तरुणीचा अपघाती जीव घेतला. त्याचे मद्य प्राशन करतानाचे पबमधील सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र, त्याने मद्य प्राशन केल्याच्या घटनेला अधिकृत दुजोरा देणारी ब्रिथ अ‍ॅनालायझर टेस्ट पोलिसांनी केलीच नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी त्याची ही टेस्ट का केली नाही, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

एकीकडे त्याने हजारो रुपयांची दारू घेतल्याची चर्चा रंगली असताना दुसरीकडे मात्र ब्रिथ अ‍ॅनालायझर टेस्टचा अहवाल अद्याप फॉरेन्सिक लॅबकडून आला नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. लोकप्रतिनिधींबरोबर समाज माध्यमांवर सामान्य नागरिकांकडूनही पोलिसांवर टीका होत आहे.
घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून कार चालविल्यानंतर पोलिसांकडून त्याची ब्रिथ अ‍ॅनालायझर टेस्ट करण्याची गरज असतानाही ती घेण्यात आली नाही, तर त्याच्या रक्ताचे सॅम्पल बर्गर आणि पिझ्झा खाऊ घातल्यानंतर आठ तासांनंतर करण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे. टेस्टबाबतच्या बाबी या अफवा असतील, तर पोलिसांचा अहवाल येण्यास एवढा उशीर का झाला? अहवाल नकारात्मक आहे अन् पोलिसही नकारात्मक आहेत म्हणून अहवाल अजून आला नाही, असे सांगण्यात येत आहे, अशीही चर्चा सर्वत्र आता रंगू लागली आहे. मात्र, असे जरी असले तरी पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे पोलिस समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर टीकेचे धनी ठरत आहेत.

सर्वसामान्यांची टेस्ट; पण श्रीमंतांना अभय

31 डिसेंबर असो किंवा इतर सुरक्षेविषयक घटना, सर्वसामान्य लोकांची ब्रिथ अ‍ॅनालायझर टेस्ट घेतली जाते. त्यात दोषी आढळल्यास संबंधितांवर दंड आकारला जातो. मात्र आरोपी श्रीमंत असेल तर कारवाई करण्यात मुद्दाम दिरंगाई केली जाते. कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची ब्रिथ अ‍ॅनालायझर टेस्ट करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे श्रीमंतांना वेगळा आणि गरीबांना वेगळा कायदा लावला जातो, हे दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button