T20 WC 2024 : वर्ल्डकप खेळणाऱ्या अमरिकेच्या संघात दिसतील ‘हे’ भारतीय खेळाडू | पुढारी

T20 WC 2024 : वर्ल्डकप खेळणाऱ्या अमरिकेच्या संघात दिसतील 'हे' भारतीय खेळाडू

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेमध्ये २०२४ (T20 WC 2024) मध्ये टी २० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अमेरिका यजमान असल्याने त्यांचा संघ या स्पर्धेत पात्र ठरला आहे. त्यामुळे २०२४ मधील टी २० वर्ल्ड कपमध्ये आपल्याला अमेरिकेचा संघ खेळताना दिसणार आहे. यानिमित्ताने अमेरिकेचा क्रिकेटसंघ पहिल्यांदाच विश्वचषकासारख्या जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत आहे. पण, टी २० विश्वचषकात सहभागी होणाऱ्या अमेरिकेच्या संघात सर्वात अधिक हे भारतीय खेळाडू असण्याची शक्यता आहे. म्हणजे अमेरिकेच्या संघाकडून निम्म्याहून अधिक खेळाडू हे भारतीय असण्याची शक्यता आहे. २०२४ मधील जून महिन्यात होणारी ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या भरवली जाणार आहे.

टी २० विश्वचषक (T20 WC 2024) स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये संयुक्तरीत्या भरवली जात असल्यामुळे हे दोन्ही संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले गेले आहेत. वेस्टइंडिज संघाने मात्र यापुर्वी दोन वेळा टी २० वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यातुलनेत अमेरिकेला अशा मोठ्या स्पर्धांचा अनुभव नाही. अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून अशा मोठ्या स्पर्धांच्या पात्रताफेरीत सहभाग नोंदवत आहे. संघाला अधिक मजबूत करण्यासाठी अमेरिकेने नुकतेच काही भारतीय खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.

त्यामुळे २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेत भारता विरुद्धच्या सामन्यात अमेरिकेकडून काही भारतीय खेळाडू खेळताना दिसले तर त्यात नवल वाटायला नको.

उन्मुक्त चंद (T20 WC 2024)

भारतीय क्रिकेट मधील उन्मुक्त चंद हे फार मोठे नाव आहे. १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा उन्मुक्त चंद हा कर्णधार होता. याशिवाय तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळला आहे. उन्मुक्त चंद हा अमेरिकेच्या संघाकडून सध्या खेळत आहे.

सनी सोहल

सनी सोहल देखिल भारत सोडून अमेरिकेत गेला आहे. हा सुद्धा आपल्याला अमेरिकेच्या संघात खेळताना दिसू शकतो. सनी सोहल हा आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स कडून सलामीवीर म्हणून खेळत होता.

सिद्धार्थ त्रिवेदी

सिद्धार्थ त्रिवेदी हा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. त्याने जलदगती गोलंदाज म्हणून मोठी भूमिका बजावली आहे. क्रिकेटमधील करिअर यशस्वी करण्यासाठी तो अमेरिकेच्या संघात दाखल झाला आहे. भारतातील क्रिकेटचा त्याला भरपूर अनुभव आहे.

बिपुल शर्मा

आयपीएलचा २०१६ च्या हंगामाचा विजयी संघ सनरायजर्स हैदराबादचा बिपुल शर्मा सदस्य होता. त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन तो अमेरिकेत स्थिर झाला आहे. त्यामुळे बिपुल शर्मा देखिल अमेरिकेच्या संघात दाखल होण्याची शक्यता आहे.

सौरभ नेत्रावलकर

सोरभ नेत्रावलकर हा २०१० च्या अंडर – १९ वर्ल्डकप संघाचा सदस्य होता. त्याने केएल राहूल सोबत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या तो अमेरिकेच्या संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू आहे.

करण विराडिया

करण विराडिया याने सुद्धा अंडर – १९ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३ मध्ये तो एका चुकीच्या प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला व तिथे त्याने त्याचे क्रिकेट खेळणे चालू ठेवले. हा देखिल अमेरिकेच्या संघात आपल्याला खेळताना दिसू शकेल.

Back to top button